छत्रपती संभाजीनगर : कमी कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षात स्थिरावलेले तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या विरोधात काँग्रेसने धीरज पाटील हा तरुण चेहरा उतरवला आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून दीर्घ काम करणाऱ्या अप्पासाहेब पाटील यांचे ते चिरंजीव आहेत. या मतदारसंघातून वयाच्या ८१ व्या वर्षी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांनी उमेदवारी मागितली होती. त्यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राणा जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. शरद पवार यांचे खंदे समर्थक असणाऱ्या डॉ. पद्मासिंह पाटील यांच्या घरातून झालेल्या या बंडामुळे तेव्हा राजकीय पटलावर बराच गहजब झाला होता. त्यानंतर शरद पवार यांनी सोलापूरहून राजकीय दौऱ्यास प्रारंभ करत धाराशिवमध्ये पहिली सभा घेतली होती. पुढे राणा जगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर या मतदारसंघाची निवड केली. २०१४ मध्ये ते निवडून आले. या वेळी निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडीकडून त्यांच्याविरोधात कोण उमेदवार उतरविणार याविषयीच्या उत्सुकता होती. काँग्रेसने तरुण उमेदवार धीरज पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

हेही वाचा:रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय पक्ष प्रचारापुरते; महाविकास आघाडी, महायुतीत एकही जागा नाही

राणा जगजितसिंह पाटील यांनी गेल्या अडीच वर्षात विविध कामांसाठी निधी मिळवून विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविणार असल्याचे संकेत दिले आहेत. तुळजापूरमध्ये कृष्णा- मराठवाडा प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी उपलब्ध होईल असे त्यांनी जाहीर केले आहे. या कामाची प्रगती कोठपर्यंत याचा आढावा सादर करण्यासाठी एक दौराही आयोजित केला होता.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress dhiraj patil vs bjp ranajagjitsinha patil in tuljapur vidhan sabha constituency print politics news css