अकोला : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली. काँग्रेस आणि वंचितची लोकसभा निवडणुकीतील आघाडी होणार का? यावरून अंदाज बांधले जात असतानाच ॲड. आंबेडकरांनी अकोल्यातून स्वत:ची उमेदवारी जाहीर केली. आता आघाडी झाली तरी अकोल्याची जागा ॲड.आंबेडकरांसाठी काँग्रेसला सोडावी लागेल. आघाडीच्या चर्चेपूर्वीच वंचितने पुढचे पाऊल टाकल्याने काँग्रेसची कोंडी झाली. आता काँग्रेस व वंचितची आघाडी होण्यावरून साशंकता व्यक्त होत असून अकोल्यात पुन्हा एकदा तिरंगी लढतीचे संकेत मिळत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेते जोमाने कामाला लागले. निवडणुकीसाठी जुळवाजुळव व तळागाळातून मोर्चेबांधणी केली जात आहे. लोकसभा निवडणूक लढण्याच्या घोषणेमध्ये वंचितने त्यात आघाडी घेतली. परंपरागत अकोला लोकसभा मतदारसंघातून ॲड. प्रकाश आंबेडकर स्वत: निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. १९८४ पासून ॲड. आंबेडकर सातत्याने अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढत आहेत. आता २०२४ मध्ये सलग अकराव्यांदा ते येथून आपले नशीब आजमावणार आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघावर १९८४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसने आपले वर्चस्व राखले. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे नेते स्व.भाऊसाहेब फुंडकर यांनी काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावला. त्यानंतरच्या लोकसभा निवडणुका लढूनदेखील काँग्रेसचा सातत्याने पराभवच झाला. १९९८ आणि १९९९ च्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विजय मिळवला आहे. २००४ पासून सलग चार लोकसभा निवडणुका खासदार संजय धोत्रे यांनी जिंकून अकोला मतदारसंघ भाजपचा अभेद्य गड निर्माण केला. भाजप, काँग्रेस व वंचित आघाडीमध्ये झालेल्या तिरंगी लढतीत, भाजपला थेट लाभ झाल्याचा अकोल्याचा इतिहास आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर व काँग्रेस एकत्र आल्याशिवाय भाजपचा पराभव होऊ शकत नसल्याचे लोकसभेच्या गेल्या नऊ निवडणुकांच्या निकालावरून समोर येते.

हेही वाचा – ‘इंडिया’च्या बैठकीच्या वेळीच सत्ताधारी विरोधकांना कोणता दणका देणार?

गेल्या दोन दशकांतील लोकसभा निवडणुकांमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर व काँग्रेसमध्ये आघाडीच्या चर्चेचे गुऱ्हाळ चालते. प्रत्यक्षात १९९९ नंतर ॲड.आंबेडकर आणि काँग्रेसमध्ये आघाडी झाली नाही. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून केवळ प्रसारमाध्यमांमधूनच चर्चा रंगते. तडजोडीअभावी गेल्या चार लोकसभा निवडणुकांमध्ये ते स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरले. दोन्ही बाजूने पाडापाडीचे राजकारणदेखील केले जात असल्याचा आरोप आहे. तिरंगी लढतीचे समीकरण आतापर्यंत भाजपच्या पथ्थ्यावर पडले. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ॲड. आंबेडकर व काँग्रेसच्या आघाडीची चर्चा सुरू झाली. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून आघाडीसंदर्भात बोलणी केली. दिल्ली येथील वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाल्याचीदेखील चर्चा आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकरांनी आघाडीच्या निर्णयाची वाट न पाहता वंचित आघाडी लोकसभा निवडणूक लढण्यासह स्वत:च्या उमेदवारीची घोषणा केली. त्यामुळे आता आघाडी झाल्यास ॲड. आंबेडकरांसाठी काँग्रेसला अकोल्याची जागा सोडावी लागेलच. काँग्रेसचा सातत्याने पराभव होत असलेल्या इतरही काही जागांवर ॲड. आंबेडकरांचा दावा राहील. या घोषणेच्या माध्यमातून ॲड. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसपुढे टाकलेल्या गुगलीचा सामना आता ते कशा पद्धतीने करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आघाडीवरून काँग्रेसमध्ये मतमतांतरे

ॲड. प्रकाश आंबेडकरांसोबत आघाडी करण्यावरून काँग्रेसमध्ये जिल्ह्यापासून ते राज्यस्तरापर्यंत नेत्यांमध्ये मतमतांतरे आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांमुळे काँग्रेसला अनेक ठिकाणी मोठा फटका बसला. तो धोका यावेळेस टाळण्यासाठी काही वरिष्ठ नेते युतीसाठी आग्रही आहेत, तर काही वरिष्ठांचा विरोधदेखील असल्याची खात्रीलायक माहिती आहे. लोकसभेच्या अकोला जिल्हा आढावा बैठकीत बहुतांश नेत्यांनी काँग्रेसनेच ही जागा लढवण्याची मागणी केली, तर काहींनी वंचितसोबत आघाडी करण्याचे मतसुद्धा नोंदवले आहे.

हेही वाचा – शिवसेना-काँग्रेसच्या संयुक्त सभेचा प्रस्ताव बारगळला!

आघाडी करण्यासंदर्भात काँग्रेसने आपली भूमिका जाहीर करावी. लोकसभा निवडणुकीत आघाडी करण्यासाठी आमच्याकडून चर्चेची द्वारे उघडी आहेत. – ॲड. प्रकाश आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी.