नगरः विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार तथा अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यावरच पक्षाने अन्याय केल्याची भूमिका घेत त्यांचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. साळुंखे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक मानले जातात.
बाळासाहेब साळुंखे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे राजीनामा पाठविला आहे. आपण गेली तीन वर्षे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) म्हणून काम पाहत होतो. विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे यांच्यावर पक्षाने अन्याय केला. या अन्यायाचा निषेध म्हणून मी पदाचा राजीनामा देत आहे. तो मंजूर करावा, असे राजीनामा पत्रात साळुंखे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – दिग्विजय सिंह यांची वादग्रस्त वक्तव्ये आणि काँग्रेस पक्षाची अडचण
सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर लगेचच जिल्हाध्यक्ष साळुंखे यांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला होता. उमेदवार सत्यजित तांबे व त्यांचे वडील मावळते आमदार डॉ. सुधीर तांबे या दोघांवरही पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे.
साळुंखे यांनी सत्यजित तांबे यांना दिलेल्या पाठिंब्याची दखल घेत प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी साळुंखे यांना दोन दिवसांत खुलासा करण्याची नोटीस बजावली होती. त्यामुळे साळुंखे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार होती. साळुंखे यांनी खुलासा न करता आपले राजीनामापत्र प्रदेशाध्यक्षांना धाडले आहे.
काँग्रेसचे दुसरे जिल्हाध्यक्ष, नगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मात्र सत्यजित तांबे यांच्या विरोधात भूमिका घेत पक्षाची पाठराखण करत महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले आहे. किरण काळे हेही थोरात समर्थक म्हणूनच ओळखले जातात. परंतु, दोन जिल्हाध्यक्षांच्या, दोन थोरात समर्थक पदाधिकाऱ्यांच्या भूमिका परस्पर विरोधी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हा काँग्रेसची पदाधिकारी बुचकळ्यात पडले आहेत.