आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना अटक केल्यानंतर भाजपा पहिला राजकीय पक्ष होता, ज्यांनी यावर प्रतिक्रिया नोंदविली. आंध्र प्रदेश भाजपाच्या प्रदेशाध्यक्षा दग्गुबाती पुरंदेश्वरी यांनी नायडू यांच्यावरील कारवाईचा निषेध केला. “कोणत्याही शासकीय प्रक्रियेचे आचरण न करता, पुरेसे स्पष्टीकरण न देता, एफआयआरमध्ये नाव नसतानाही आणि योग्य पद्धतीने नोटीस न देता ही अटक करण्यात आली आहे”, अशा शब्दात पुरंदेश्वरी यांनी कारवाईचा विरोध केला. अभिनेते आणि आता जन सेना पक्षाची (JSP) स्थापना करून राजकारणात उतरलेले के. पवन कल्याण यांनीही या अटकेचा निषेध नोंदविला. सत्ताधारी वायएसआर काँग्रेस पक्ष (YSRCP) लोकशाही विरोधी राजवट चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला. तर आंध्र प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष एस. मस्तान म्हणाले की, आम्ही या प्रकरणात पुढे काय होते, त्यावर लक्ष ठेवून आहोत, त्यानंतर आम्ही प्रतिक्रिया देऊ.

पवन कल्याण या प्रकरणावर बोलताना म्हणाले की, आंध्र प्रदेशमध्ये आता कोणताही ठोस पुरावा न दाखविता रात्री उशीरा अटक करण्याची पद्धत अवलंबली जात आहे. मागच्या वर्षी विशाखापट्टनम येथे पोलिसांनी आमच्या पक्षाला कशी वागणूक दिली, हे सर्वांनीच पाहिले होते. आमच्या जन सेना पक्षाच्या नेत्यांना हत्येचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्यात आले. आज चंद्राबाबू नायडू यांना अशीच वागणूक देण्यात आली. आम्ही या अटकेचा निषेध करतो.

हे वाचा >> माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक; आंध्र प्रदेश कौशल्य विकास घोटाळा काय आहे?

वायएसआर काँग्रेसवर टीका करताना पवन कल्याण पुढे म्हणाले, “विरोधकांना दाबणे हेच सरकारचे धोरण दिसत आहे. सरकाच्या कृतीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. उलट वायएसआर काँग्रेसचे पदाधिकारी जाहीर निवेदन देत आहेत की, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पक्ष, पोलिस आणि सरकार त्याला तोंड देण्यासाठी तयार आहे. पोलिस प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आहे, मग वायएसआर काँग्रेस पक्षाचा कायदा व सुव्यवस्थेशी काय संबंध? हे समजत नाही. पक्षाच्या प्रमुखाला जर अटक झाली तर त्यांचे कार्यकर्ते, अनुयायी बाहेर पडून आंदोलन करणारच. तो लोकशाहीचा भाग आहे.”

“वायएसआर काँग्रेस पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी तेलगू देसम पक्ष (TDP) आणि भाजपा (BJP) यांच्यात होणाऱ्या युतीमध्ये सामील होण्यासाठी जन सेवा पक्ष (JSP) इच्छूक आहे. भाजपा-टीडीपी-जेएसपीची युती आगामी काळात सत्ताविरोधी मतांचे विभाजन रोखेल आणि राज्याच्या सत्तेवर बसलेल्या वायएसआर काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचेल”, असेही पवन कल्याण म्हणाले.

१७५ सदस्य असलेल्या आंध्र प्रदेश विधानसभेत सध्या वायएसआर काँग्रेस पक्षाचे १५१ आमदार आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर तेलगू देसम पक्ष असून त्यांचे २३ आमदार आहेत. जन सेवा पक्षाचा एकमेव आमदार असून भाजपाचा एकही आमदार नाही.

आंध्र प्रदेशमध्ये जेएसपी आणि भाजपाची युती झालेली आहे. तसेच पवन कल्याण यांचे भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सौहार्दपूर्ण संबंध असल्यामुळे भाजपा आता तेलगू देसम पक्षाशी संबंध ठेवण्यास फारशी इच्छूक नाही. १८ जुलै रोजी पवन कल्याण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे झालेल्या एनडीए युतीच्या बैठकीला हजेरी लावली होती. यावेळी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधताना त्यांनी टीडीपीला पुन्हा युतीमध्ये घेण्याबाबत चर्चा केली होती. टीडीपी पक्षाला या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले नव्हते.

टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी ४ जून रोजी दिल्ली येथे अमित शाह यांची भेट घेऊन संभाव्य युतीसाठी चर्चा केली होती. मात्र टीडीपीला भाजपाचा विरोध कायम आहे. पवन कल्याण यांच्या पाठिंब्यावर टीडीपी युतीमध्ये पुन्हा सामील होण्याचा प्रयत्न करत आहे.

भाजपामधील सूत्रांनी सांगितले की, भाजपा पक्ष सध्या वायएसआर काँग्रेस पक्ष आणि तेलगू देसम पक्ष यांच्यापासून अंतर राखू इच्छित आहे. पक्षांतर्गत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतरच भाजपा-जेएसपी-टीडीपी यांची युती होण्याबाबत निर्णय होऊ शकतो. चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष हा पूर्वी एनडीएचाच भाग होता. मात्र २०१८ मध्ये आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याची मागणी पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. परंतु या निर्णयामुळे त्यांना २०१९ च्या निवडणुकीत फारसा लाभ झाला आहे.

Story img Loader