लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. प्रत्यक्ष मतदानालाही लवकरच सुरुवात होणार आहे. मात्र बिहार, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांत जागा मिळवण्यासाठी काँग्रेसला तारेवरची कसरत करावी लागत आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरून अनेक राज्यांत काँग्रेस बॅकफूटवर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे विविध राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिहारमध्ये महागठबंधनमधील पक्षांत जागावाटप निश्चित झालं आहे. मात्र, यात काँग्रेस बॅकफूटवर आहे. महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसने मागितलेल्या जागांपैकी काही जागा काँग्रेसला मिळालेल्या नाहीत. यामध्ये पूर्णियाच्या जागेचा समावेश आहे. ही जागा काँग्रेसला देण्यास आरजेडीने नकार दिला आहे. काँग्रेसने ही जागा माजी खासदार राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव यांच्यासाठी मागितली होती. राजेश रंजन यांनी काही दिवसांपूर्वीच आपला जनाधिकार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता. २०१९ मध्ये ही जागा काँग्रेसने लढवली होती.

हेही वाचा – मुंबईतील तीन मतदारसंघांतील तिढ्याने उमेदवारांचा शोध सुरू

याशिवाय आरजेडीने सुपौलची जागादेखील काँग्रेसला देण्यास नकार दिला आहे. सुपौलमधून काँग्रेसच्या सचिव रणजीत रंजन यांनी २००४, २०१४ आणि २०१९ मधून निवडणूक लढवली होती.

पूर्णिया आणि सुपौलच्या जागेव्यतिरिक्त बेगुसरायची जागाही काँग्रेसला देण्यास आरजेडीने नकार दिला आहे. २०१९ मध्ये या जागेवरून कन्हैया कुमार यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, ते सीपीआयमध्ये होते. २०२१ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यामुळे काँग्रेसने ही जागा कन्हैया कुमार यांच्यासाठी मागितली होती. याशिवाय आरजेडीने औरंगाबादची जागादेखील काँग्रेसला देण्यास नकार दिला.

काँग्रेससाठी दिलासादायक बाब म्हणजे, बऱ्याच वाटाघाटीनंतर आरजेडीने काँग्रेसला बिहारमध्ये नऊ जागा देण्याचे मान्य केले आहे. अर्थातच यामुळे पक्षात नाराजी आहे. मात्र, असे असले तरी जागावाटपावरून आरजेडीशी युती तोडणे हे काँग्रेसला राजकीयदृष्ट्या सध्या तरी परवडणारे नाही. त्यामुळे काँग्रेसने नऊ जागा मान्य केल्याचं सांगण्यात येत आहे.

बिहारबरोबरच तामिळनाडूमध्येही डीएमकेने काँग्रेसला तीन जागा बदलण्यास भाग पाडले आहे. महत्त्वाचे म्हणजे २०१९ मध्ये या तिन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीएमकेने चार ते पाच जागा बदलण्याची मागणी काँग्रेसकडे केली होती. मात्र, अनेक वाटाघाटीनंतर काँग्रेसने तीन जागा बदलण्याचे मान्य केले. यामध्ये थेनी, अरणी आणि तिरुचिरापल्ली या जागांचा समावेश आहे. या बदल्यात काँग्रेस तिरुनेलवेली, कुड्डालोर आणि मायलादुथुराई या जागा लढवणार आहेत.

महाराष्ट्रात काँग्रेसची शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाशी युती आहे. मात्र, तिन्ही पक्षांत जागावाटपावरून मतभेद सुरू आहेत. सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई या जागा काँग्रेसने मागितल्या आहेत. मात्र, जागा सोडण्यास शिवसेना (उद्धव ठाकरे गट) तयार नाही. यावरून दोन्ही गटात संघर्ष सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने सांगली आणि दक्षिण मध्य मुंबईसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणाही केली आहे, त्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी आहे.

हेही वाचा – शिवराज पाटील यांच्या स्नुषेच्या भाजप प्रवेशाने लातूरमधील राजकीय गणिते बदलली

यासंदर्भात बोलताना महाराष्ट्रातील काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, ”नेत्यांनी पक्षाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. मात्र, त्यासाठी मित्रपक्षांशी असलेले संबंध तोडू नये. खरं तर आम्ही जोर लावला असता, तर आम्हाला हव्या त्या जागा मिळाल्या असत्या. मात्र, अशावेळी आम्ही राष्ट्रीय पक्ष म्हणून मोठं मन दाखवत नाही, असा आरोप आमच्यावर झाला असता.”

बिहार, तामिळनाडू आणि महाराष्ट्राव्यतिरिक्त उत्तर प्रदेशातही जागावाटपावरून काँग्रेस बॅकफूटवर आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेस १७ जागा लढवणार आहे. मात्र, यापूर्वी समाजवादी पक्ष काँग्रेसला केवळ ११ जागा देण्यास तयार होता. पण, आरएलडीने इंडिया आघडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने सपाने काँग्रेसला १७ जागा देण्याचे मान्य केले. मात्र, काँग्रेसला १७ जागा दिल्या असल्या तरी हव्या त्या जागा काँग्रेसला मिळाल्या नाही. उत्तर प्रदेशात काँग्रेसने फर्रुखाबाद, भदोही, लखीमपूर खेरी, श्रावस्ती आणि जालौन मागणी केली होती. पण, या जागा देण्यास समाजवादी पक्षाने नकार दिला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress does tightrope over loksabha seats in bihar up maharashtra and many state spb