Congress Eagle Committee News : निवडणूक निकाल आणि मतदार यादीतील अनियमिततेच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी काँग्रेसने रविवारी ‘ईगल’ समिती स्थापन केली आहे. या समितीचे मुख्य उद्दिष्ट हे देशभरातील निवडणुकांवर लक्ष ठेवणे आणि भारतीय निवडणूक आयोग निःपक्षपणे निवडणुका घेत आहे का याची पडताळणी करणे आहे. गेल्या वर्षी हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठं अपयश आलं होतं. यानंतर पक्षातील अनेक नेत्यांनी मतदार यादीत फेरफार आणि ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप केला होता.
‘ईगल’ समितीत कोणकोणत्या नेत्यांचा समावेश
‘ईगल’ समितीमार्फत या आरोपांची चौकशी केली जाणार आहे. तसेच देशातील आगामी सर्व निवडणुकांवरही लक्ष ठेवलं जाणार आहे. या समितीत महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नितीन राऊत, काँग्रेसचे कोषाध्यक्ष अजय माकन, ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह, अभिषेक मनु सिंघवी, प्रवीण चक्रवर्ती, पवन खेरा, गुरदीप सिंह सप्पल आणि छल्ला वामशी चंद रेड्डी यांचा समावेश आहे. ईगल समितीचे कामकाज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील केले जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राहुल गांधी हे केंद्रीय निवडणूक आयोगावर सातत्याने टीका करीत आहेत.
आणखी वाचा : Political News : आम आदमी पार्टीच्या ८ विद्यमान आमदारांनी भाजपात प्रवेश का केला?
काँग्रेसची ईगल समिती कशी काम करणार?
काँग्रेसमधील अंतर्गत सूत्रांनी द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, ईगल समिती प्रथम महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये झालेल्या कथित घोळाचा छडा लावण्याचे काम करेल. त्यानंतर समिती ५ फेब्रुवारी रोजी दिल्लीत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवेल. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितलं, “निवडणूक आयोगाकडे निःपक्षपणे निवडणुका घेण्याची संविधानिक जबाबदारी असते. परंतु, मागील काही काळात तसे घडले नाही. हरियाणा, महाराष्ट्र आणि इतर राज्यांमधील निवडणुकांमध्ये तफावत झाल्याची आम्हाला शंका आहे, म्हणूनच पक्षाने ईगल समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.”
समितीला ईगल असं नाव का दिलं?
काँग्रेसच्या दुसऱ्या सदस्याने सांगितले की, आम्ही या समितीला ईगल असे नाव दिलं आहे, कारण देशातील सर्व निवडणुकांवर तसेच निवडणूक आयोगाच्या कामकाजावर समितीकडून बारकाईने लक्ष ठेवले जाईल. काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले की, ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेसचे प्रमुख आणि पक्षाच्या डेटा ॲनालिटिक्स विभागाचे प्रवीण चक्रवर्ती यांनी ईगल हे नाव सुचवलं आहे. त्यानंतर पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाने या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.
काँग्रेसने निवडणूक निकालांवरून काय आरोप केले?
हरियाणा विधानसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर काँग्रेसने ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप केला होता. भाजपाने रचलेलं हे षडयंत्र असून आम्हाला हा निकाल मान्य नाही, असं काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी म्हटलं होतं. ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा आरोप करत राजकीय पक्षाने जनादेश स्वीकारण्यास नकार देण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यावेळी काँग्रेसचे संपर्क प्रमुख जयराम रमेश म्हणाले, “हा निकाल राज्यातील प्रत्यक्ष परिस्थितीच्या विरोधात आहे. हरियाणातील जनतेला सत्तेत बदल आणि परिवर्तन हवे होते. या परिस्थितीत आज जाहीर झालेला निकाल स्वीकारणं आम्हाला शक्य नाही. आमच्या उमेदवारांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत… आम्ही ते निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करू.”
महाराष्ट्रात मतदारांची संख्या अचानक कशी वाढली?
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतही दारुण पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर काँग्रेसने मतदार यादीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. २९ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सहा दिवसांनी काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील मतदारांची संख्या अचानक १३ टक्के कशी वाढली, असा प्रश्न त्यांनी निवडणूक आयोगाला विचारला होता. काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात मतदार यादीत समाविष्ट केलेल्या ३९ लाख मतदारांचा कच्चा डेटा मागितला होता.
हेही वाचा : Soybean Rate : महायुतीचे सोयाबीन खरेदीचे दावे, तरीही शेतकरी संकटातच; काय आहे कारण?
काँग्रेसच्या आरोपांना निवडणूक आयोगाचं प्रत्युत्तर
दरम्यान, २४ डिसेंबर रोजी निवडणूक आयोगाने पत्र लिहून सांगितले की, महाराष्ट्रात ४८ लाख ८१ हजार ६२० मतदारांची वाढ झाली आणि आठ लाख ३९१ मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली, ज्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान एकूण ४० लाख ८१ हजार २२९ मतदार वाढले आहेत. निवडणूक आयोगाने सांगितले की, लोकप्रतिनिधी कायद्यातील दुरुस्तीनंतर, १८ वर्षांच्या नवीन मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर या चार तारखा देण्यात आल्या होत्या. यामध्ये १८ ते १९ वर्ष वयोगटातील आठ लाख ७२ हजार ९४ मतदार आणि २० ते २९ वयोगटातील १७ लाख ७४ हजार ५१४ मतदारांचा समावेश आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी काय म्हणाले होते?
केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिल्यानंतरही काँग्रेसच्या नेत्यांचे समाधान झाले नाही. १५ जानेवारी रोजी काँग्रेसच्या नवीन मुख्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी राहुल गांधी यांनी आरोप केला की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काहीतरी घोळ झाला आहे. त्यांनी असाही आरोप केला की, आपल्या निवडणूक पद्धतीत पारदर्शकतेचा अभाव आणि अनेक गंभीर समस्या आहेत. गेल्या वर्षीच्या दोन्ही निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात एक कोटी मतदारांची वाढ कशी होऊ शकते, असा प्रश्नही राहुल गांधी यांनी उपस्थित केला.