मुंबई : लोकसभेत मिळालेल्या यशाने राज्यात काँग्रेस पक्षाच्या आशा पल्लवित झाल्या असून, आगामी विधानसभा निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी उतरण्याचा निर्धार करण्यात आला आहे. राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी म्हणजे २० ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मेळाव्यात प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे. तसेच महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसने मोठ्या भावाची भूमिका वठवावी, असा एकूण पक्षात सूर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाविकास आघाडीत जागावाटपासाठी काँग्रेस पक्षाने राज्य व मुंबई पातळीवर दोन स्वतंत्र समित्या स्थापन केल्या आहेत. राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी समितीच्या सदस्यांबरोबर रविवारी चर्चा केली. लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक १३ खासदार निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस पक्ष पहिल्या क्रमांकावर यावा, असा प्रयत्न आहे. यासाठी महाविकास आघाडीतील जागावाटप हा कळीचा मुद्दा आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांनीही अधिक जागा लढविण्याचे सूतोवाच आधीच केले आहे. शिवसेनेने तर मोठ्या भावाची भूमिका बजावत मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांचा चेहरा असावा, अशी भूमिका मांडली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने जागावाटपात कच खाऊ नये, अशी नेतेमंडळींची अपेक्षा आहे.

हेही वाचा >>>सध्याची लोकसभा सर्वांत वयोवृद्ध! तरुण खासदारांची संख्या का घटली?

प्रत्येक विभागात किती जागा लढविता येतील या दृष्टीने चाचपणी करण्यात आली. मुंबईत शिवसेनेने अधिक जागांवर दावा केला असला तरी काँग्रेसची ताकद कमी नाही याकडे वर्षा गायकवाड, भाई जगताप, अस्लम शेख या मुंबईसाठी नेमलेल्या समितीच्या सदस्यांचे म्हणणे आहे. काँग्रेसला १०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या पाहिजेत अशी पक्षाच्या नेत्यांची भूमिका आहे. महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा येत्या बुधवारी होणार आहे. या दृष्टीने आढावा घेण्यात आला.

बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, बंटी पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>>जेडीयूचा विरह नि प्रशांत किशोरांचा नवा राजकीय पक्ष; बिहारमधील राजकीय पेचात तेजस्वी यादव काय करणार?

राजीव गांधी जयंतीदिनी मेळावा

राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी प्रदेश काँग्रेसच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आदी नेतेमंडळी या वेळी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडला जाईल, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही या मेळाव्याला निमंत्रित करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress expects maximum number of seats in assembly elections amy