हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव आणि जम्मू-काश्मीरमध्ये ३७ पैकी फक्त सहा जागांवर विजय प्राप्त केल्यानंतर इंडिया आघाडीतच काँग्रेसची कोंडी करण्यात येत आहे. ‘भाजपासाठी प्रादेशिक पक्ष हेच मोठे आव्हान असणार आहे’, असा संदेश प्रादेशिक पक्षांनी दिला आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, “निवडणूक जिंकण्यासाठी सर्वात सुपीक जमीन असूनही काँग्रेसचा पराभव झाला. जेव्हा जेव्हा त्यांचा थेट भाजपाशी संघर्ष झाला, तेव्हा तेव्हा त्यांचा पराभव का होतो? याचे आत्मपरिक्षण काँग्रेसने करावे. महाराष्ट्रात सध्या जागावाटपाची चर्चा सुरू आहे. हरियाणाचे निकाल डोळ्यासमोर ठेवून ही चर्चा व्हायला हवी. जमिनीवरील परिस्थिती पासून जागावाटपाची चर्चा झाली पाहीजे.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समाजवादी पक्षाकडूनही टीका

समाजवादी पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते राजीव राय यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलाताना सांगितले की, काँग्रेसला इंडिया आघाडीचे नेतृत्व करायचे होते. “हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आम्हाला एकही जागा देऊ केली नाही. भुपिंदरसिंह हुड्डा म्हणाले की, आमचे हरियाणात अस्तित्व नाही. मध्य प्रदेशमध्येही लोकसभेआधी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने अशाच प्रकारची भूमिका घेतली होती. ज्या ठिकाणी काँग्रेसचे अस्तित्व नाही, तिथे काँग्रेस आमच्याकडे येऊन जागा मागतात. मात्र ज्या राज्यात ते प्रभावशाली आहेत. त्या राज्यात काँग्रेस इतर मित्रपक्षांना जागा देत नाही. आता आघाडीतही सर्वांचा सन्मान ठेवला गेला पाहीजे, हे धोरण काँग्रेसने भविष्यात स्वीकारावे.

हे वाचा >> Rahul Gandhi on Haryana Election Result: हरियाणातील पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “निवडणूक आयोगाला…”

तृणमूल काँग्रेसनेही सुनावले

तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभा खासदार सागरिका घोष म्हणाल्या की, इंडिया आघाडीतील प्रादेशिक पक्ष ही आघाडीची मुख्य ताकद आहे. “तुम्ही लोकसभेचा निकाल पाहा. ज्या ठिकाणी काँग्रेसची प्रादेशिक पक्षांशी आघाडी होती, तिथे इंडिया आघाडीला चांगले यश मिळाले. आजवर प्रादेशिक पक्षांनीच भाजपाला थेट टक्कर दिली आहे. काँग्रेसने हे सत्य स्वीकारले पाहीजे आणि भविष्यातील निवडणुकांमध्ये मित्र पक्षांना आघाडीत सन्मान दिला पाहीजे.

तमिळनाडूमधील द्रमुक पक्षाचेही खडे बोल

तमिळनाडूमधील द्रमुक पक्षाचे प्रवक्ते सर्वनन अण्णादुराई म्हणाले, हरियाणाच्या पराभवातून काँग्रेसने काहीतरी शिकावे. यातून महाराष्ट्राची निवडणूक कशी हाताळावी, हे त्यांना कळेल. काँग्रेस आणि मित्रपक्षांनी मजुबतीने एकत्र राहून भाजपाचा पराभव करावा.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी. राजा म्हणाले की, इंडिया आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा योग्य पद्धतीने होत नाही. इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांनी आता आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. काँग्रेसशी जागावाटपाची चर्चा करताना विश्वास दाखविला जात नाही.

आम आदमी पक्षाकडूनही टीका

आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह म्हणाले की, काँग्रेसने हरियाणा निवडणुकीत आम्हाला बरोबर घेतले नाही. सिंह म्हणाले, हरियाणामध्ये भाजपाचा पराभव करण्यासाठी ‘आप’ला बरोबर घ्यावे, असे आम्ही सांगत होतो. समाजवादी पक्षानेही प्रयत्न केले. पण काँग्रेसने कुणालाही बरोबर घेतले नाही. काँग्रेसने या पराभवाचे विश्लेषण केले पाहीजे.

लोकसभा निवडणुकीचा दाखला देताना संजय सिंह म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचे केवळ दोन आमदार असताना समाजवादी पक्षाने तिथे काँग्रेसला १७ जागा देऊ केल्या होत्या. आम्ही इंडिया आघाडीला उत्तर प्रदेशमध्ये बिनशर्त पाठिंबा दिला. महाराष्ट्रातही आम्ही एकही जागा लढवत नव्हतो, तरीही अरविंद केजरीवाल तिथे प्रचारासाठी गेले होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress faces allies flak after haryana result shiv sena uddhav thackeray talks of ground realities kvg