दक्षिण काश्मीरमधील पहलगाम शहरात दहशतवाद्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यात किमान २६ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. विरोधी पक्षांनीही या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी केंद्र सरकारला पहलगामचा बदला घेण्यासाठी पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. यादरम्यान राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर असताना त्यांचा संबंध पहलगाम हल्ल्याशी जोडल्याच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे कर्नाटक काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी याविरोधात कर्नाटक भाजपाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नेमके हे प्रकरण काय? त्यांच्याविषयी सोशल मीडिया पोस्टमध्ये काय लिहिण्यात आले? जाणून घेऊ.
प्रकरण काय?
राहुल गांधींच्या अमेरिक दौऱ्याचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंध जोडल्याबद्दल कर्नाटक काँग्रेसने कर्नाटक भाजपाच्या सोशल मीडिया टीमविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) कर्नाटक युनिटने राहुल गांधी यांच्यावर वैयक्तिक टीका केली होती आणि आरोप केला होता की, प्रत्येक वेळी जेव्हा ते विदेशात जातात तेव्हा देशात काहीतरी भयानक व वेदनादायक घटना घडतात. राहुल गांधी नुकतेच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भाजपाने सोशल मीडियाद्वारे राहुल गांधी यांच्यावर ही टीका केली होती. काँग्रेसचे मानवाधिकार कक्षाचे अध्यक्ष सी. एम. धनंजय यांनी याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, दुपारी ३.४२ वाजता पक्ष कार्यालयात असताना त्यांना भाजपा कर्नाटक युनिटने केलेल्या ट्विटचा संदेश व्हॉट्सअॅपवर मिळाला. ट्विटमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, जेव्हा जेव्हा राहुल गांधी विदेशात जातात तेव्हा तेव्हा देशात काहीतरी भयानक घडते. त्यांच्या दौऱ्याचा संबंध पहलगाम हल्ल्याशी जोडला गेला.
सी. एम. धनंजय म्हणाले, असे संदेश शांतता आणि सौहार्दता बिघडवतात. यामागे अशांतता निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश आहे. भाजपा सोशल मीडिया हँडल चालवणाऱ्यांवर, तसेच राहुल गांधी यांची बदनामी करण्याचा आणि त्यांच्या सन्मानाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
राहुल गांधी हल्ल्यावर काय म्हणाले?
“जम्मू व काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याची बातमी अत्यंत निषेधार्य आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे. मी शोकाकुल कुटुंबांबद्दल संवेदना व्यक्त करतो आणि जखमी लवकर बरे व्हावेत, अशी आशा व्यक्त करतो,” असे राहुल गांधी म्हणाले. “पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याबद्दल गृहमंत्री अमित शाह, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला व जम्मू-काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष तारिक कर्रा यांच्याशी बोललो. परिस्थितीची माहिती मिळाली. पीडितांच्या कुटुंबीयांना पूर्ण पाठिंबा मिळायला हवा,” असे ते म्हणाले.
गुरुवारी (२४ एप्रिल) दिल्लीत सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीत विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला पहलगामचा बदला घेण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला आहे. तसेच हा हल्ला म्हणजे आपल्या संरक्षण यंत्रणेत, गुप्तचर यंत्रणेत कमतरता आहे, असे विरोधक म्हणाले. राहुल गांधी बैठकीनंतर म्हणाले, “आम्ही सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा मुद्दा उपस्थित केला आहे. आपल्याकडे त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था असूनही अशी चूक कशी होऊ शकते? हजारो पर्यटक तिथे होते आणि पोलिसांना त्याची जराही कल्पना नव्हती. त्यामुळेच तिथे सुरक्षा व्यवस्था नव्हती”.