संजीव कुळकर्णी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नांदेड : काँग्रेसची भारत जोडो यात्रा हैदराबादसह आंध्र-तेलंगणातून मराठवाड्यात येत असताना, या भागाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे काँग्रेसजनांना विस्मरण झाल्याचे दिसत आहे. खासदार राहुल गांधी यांच्या यात्रेच्या चार दिवसांमध्ये हुतात्मा स्मारक किंवा स्वामी रामानंद तीर्थ यांना अभिवादन करण्याचा एकही कार्यक्रम नाही. दुसर्‍या बाजूला भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अमृतमहोत्सवानिमित्त व्यापक कार्यक्रम करण्यासंदर्भात मंगळवारी एक बैठक घडवून आणली.

भारताला १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तत्कालीन हैदराबाद संस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी तब्बल १३ महिने संघर्ष करावा लागला होता. तेलंगणा व कर्नाटकातील काही जिल्ह्यांसह आजचा मराठवाडा १७ सप्टेंबर १९४८ साली स्वतंत्र झाला. त्याचे अमृतमहोत्सवी वर्ष सध्या सुरू असले, तरी भारत जोडो यात्रा पूर्वीच्या हैदराबाद संस्थानातून मराठवाड्यात दाखल होत असताना नव्या पिढीतील काँग्रेसजनांनी यात्रेमध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासह हैदराबादच्या स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख नेत्यांचे कोठेही स्मरण केले नाही.

हेही वाचा… रामदास आठवले यांचे पिंपरी राखीव मतदारसंघावर विशेष लक्ष

उल्लेखनीय बाब म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ यांचे पी.व्ही.नरसिंहराव (आंध्र), वीरेंद्र पाटील (कर्नाटक) आणि शंकरराव चव्हाण (महाराष्ट्र) हे तीन अनुयायी नंतरच्या काळात आपापल्या राज्यांमध्ये आधी मुख्यमंत्री झाले. पुढे पी.व्ही. देशाचे पंतप्रधान तर शंकरराव त्यांच्यासोबतच गृहमंत्री झाले.
हैदराबादच्या स्वातंत्र्यसंग्रामात आजचा नांदेड जिल्हा महत्त्वाचे केंद्र होता. याच जिल्ह्यात सर्वाधिक हुतात्मा झाले. निजामी राजवटीला हादरे देणार्‍या अनेक घटनांची या जिल्ह्यात नोंद झाली. स्वामी रामानंद तीर्थ यांनी या जिल्ह्याला आपली एक कर्मभूमी मानले. स्वातंत्र्यानंतर त्यांनी हैदराबाद प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले; पण यात्रेची प्रसिद्धी करताना त्यांच्या महत्त्वाच्या योगदानाचे कोठेही स्मरण झालेले नाही.

हेही वाचा… लातूरमधील भाजप नेत्यांना पालकमंत्री गिरीश महाजन यांचे एकीच्या बळाचे धडे

या पार्श्वभूमीवर भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्राचे समन्वयक बाळासाहेब थोरात यांच्याकडे विचारणा केली असता, हैदराबाद संस्थान स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची चर्चा एकदा झाली होती; पण यात्रेदरम्यान त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केले. थोरात यांचे समन्वयातील सहकारी मोहन जोशी यांनी नांदेडच्या जाहीर सभेत हैदराबादच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची नोंद घेतली जाईल, असे आता सांगितले आहे.

हेही वाचा… ‘भारत जोडो’ स्वागतासाठी ८० किलोमीटरचा परिसर सजला; तिरंगा, राहुल गांधींची हसरी प्रतिमा आणि अशोकराव चव्हाण यांच्या मुलीचेही फलक

दरम्यान, भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पुढाकारातून सोमवारी जिल्हाधिकारी कचेरीत एक बैठक झाली. अमृतमहोत्सवानिमित्त पुढील काळात कोणते कार्यक्रम घ्यावेत यासंबंधीच्या वेगवेगळ्या सूचना या बैठकीमध्ये मांडण्यात आल्या. आणखी काही सूचना मागवून प्रशासनाने सविस्तर प्रस्ताव तयार करावा, असे खा.चिखलीकर यांनी जिल्हाधिकार्‍यांना सांगितले. या बैठकीस सांस्कृतिक व नाट्य क्षेत्रांतील मंडळींसह भाजपशी संबंधित अनेक जण हजर होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress forgot about 75th year of marathwada freedom print politics news asj