Varanasi Congress leader joins BJP देशात आगामी निवडणुकांचे वारे वाहत असताना काँग्रेसमधून नेत्यांचे पक्षांतर सुरू आहे. पंतप्रधान मोदींच्या वाराणसी या मतदारसंघातच ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने भाजपात प्रवेश केला आहे. वाराणसीचे माजी खासदार राजेश मिश्रा यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला काँग्रेस सोडण्याचा आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाने येत्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राजेश मिश्रा यांच्या भाजपाप्रवेशाने पूर्व उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेससाठी पोकळी निर्माण झाली आहे. दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात राजेश मिश्रा यांनी अधिकृतपणे भाजपामध्येप्रवेश केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळवारी पक्षप्रवेशानंतर मिश्रा यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना ते म्हणाले, “मला तिकीट किंवा कोणतेही पद नको होते. मला फक्त आदर हवा होता; जो राजकारणात महत्त्वाचा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या उन्नतीसाठी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. त्यांचे कार्य पाहून मी भाजपामध्ये प्रवेश केला. मोदीजींचा कोणीही सामना करू शकत नाही.” अजय राय यांची पूर्व उत्तर प्रदेशच्या राज्य युनिट प्रमुखपदी निवड केल्याने वर्षभरापासून मिश्रा नाराज होते.

मिश्रा यांचा राजकीय प्रवास

राजेश मिश्रा यांनी १९८० च्या दशकात बनारस हिंदू विद्यापीठातून विद्यार्थी नेता म्हणून राजकीय कारकीर्द सुरू केली. १९८४ मध्ये त्यांना विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवायची होती; परंतु युनियन बरखास्त झाल्यामुळे आणि पुढील १० वर्षांसाठी निवडणुका थांबविण्यात आल्याने ते निवडणूक लढवू शकले नाहीत. १९८६ मध्ये ते अपक्ष आमदार म्हणून प्रथम निवडून आले आणि पुढच्या वर्षी ते काँग्रेसमध्ये सामील झाले.

२००४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी वाराणसीमधून तीन वेळा भाजपाचे खासदार राहिलेल्या शंकर प्रसाद जैस्वाल यांचा पराभव केला. पण, पाच वर्षांनंतर त्यांना मतदारसंघ गमवावा लागला. या निवडणुकीत भाजपाचे माजी अध्यक्ष मुरली मनोहर जोशी विजयी झाले. तत्कालीन बसपा नेते मुख्तार अन्सारी व समाजवादी पक्ष नेते राय यांच्यानंतर ते चौथ्या क्रमांकावर होते. २०१४ मध्ये काँग्रेसने मिश्रा यांना वाराणसीतून तिकीट नाकारले आणि राय यांना मोदींच्या विरोधात उभे केले.

पूर्व उत्तर प्रदेशातील काही काँग्रेस नेत्यांनी सांगितले की, त्यांच्या जाण्यामुळे उत्तर प्रदेशातील इंडिया आघाडीवर विशेषत: लोकसभेच्या वाराणसी, चंदौली, मिर्झापूर व गाझीपूर या जागांवर परिणाम होईल. कारण या ठिकाणी मिश्रा यांचा तरुण, विद्यार्थी व उच्च जातींमध्ये प्रभाव असल्याचे म्हटले जाते. “पक्षाने एक दिग्गज नेता गमावला हे दु:खद आहे; पण आपण काय करू शकतो? ते त्यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे निघून गेले,” असे वाराणसीतील एका काँग्रेस नेत्याने सांगितले.

हेही वाचा : ओवैसींविरोधात प्रथमच हिंदुत्ववादी महिला निवडणुकीच्या रिंगणात; कोण आहेत भाजपाच्या माधवी लता?

लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी आपण दुसरी जागा शोधत आहात का, असे विचारले असता मिश्रा म्हणाले, “मी भदोहीमधून निवडणूक लढवू शकेन. मी काँग्रेसमध्ये असताना तिथून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, अद्याप जागेबाबत भाजपाच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा झालेली नाही. मी हा निर्णय पक्षनेतृत्वावर सोडला आहे.”

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress former varanasi mp rajesh mishra joins bjp rac
Show comments