नागपूर : कायम काँग्रेससोबत राहिलेल्या विदर्भात गेल्या निवडणुकीत मोठी पडझड झाली असली तरी येथील जनमानसावर पुरोगामी आणि प्रगतिशील विचारांचा पगडा असल्याने काँग्रेसने २०२४ च्या लोकसभा निवडणूक प्रचाराचे नारळ फोडण्यासाठी नागपूर निवडले. विशेष म्हणजे नागपुरात प्रतिकूल परिस्थितीतही काँग्रेसने सभा यशस्वी करून दाखवल्याने कार्यकर्त्यांची मरगळ दूर झाली आहे. दुसरीकडे यामुळे प्रदेश नेतृत्वावरही शिक्कामोर्तब झाल्याचे दिसून आले.
काँग्रेस पक्षाने १३९ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात जाहीर सभा घेतली. सभेचे नियोजन प्रदेश काँग्रेस आणि शहर काँग्रेसकडे होते. पक्षाचे देभरातील सर्व प्रमुख नेते आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य या सभेला उपस्थित राहणार असल्याने आयोजकांची कसोटी लागली होती. पण, नेत्यांच्या एकजुटीने सभा यशस्वी झाली. याचा फायदा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना होण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या नेतृत्वावर पक्षातूनच एक गट प्रश्नचिन्ह उपस्थित करीत होते. सभा महत्त्वाची होती आणि त्याची जबाबदारी पटोले यांनी घेतली होती. पण, काँग्रेसची विद्यमान परिस्थिती बघता ते पेलणे सोपे नव्हते. पक्षातील नेत्यांची पायातपाय घालण्याची वृत्ती सर्वश्रूत आहे. त्यामुळे सभा यशस्वी होते की नाही, याबाबत साशंकता होती. पण, सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केले. त्यामुळे सभेला प्रचंड गर्दी जमू शकली. त्याला हातभार शेजारच्या राज्यांचा लागला. त्याच्यामुळे ही सभा दणदणीत झाली. ही सभा यशस्वी होऊ नये म्हणून भाजपने नेहमीप्रमाणे प्रयत्न केले. मात्र, सभेसाठी शहराच्या बाहेर खासगी मैदान घेऊन त्यांच्या डावपेचावर मात केली. असे असले तरी प्रदेश पातळीवरील उणिवाही चव्हाट्यावर आल्या. राज्यातील विविध जिल्ह्यांतील आणि शेजारच्या राज्यातील कार्यकर्ते सभेला आले. पण शेजारचा गांधी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या वर्धा जिल्ह्यातून अत्यल्प कार्यकर्ते का आले यावर विचार पक्षाला करावा लागणार आहे.
हेही वाचा – इंडिया – महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटणार कसा ?
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सभेच्या तयारीसाठी परिश्रम घेतले. शिवाय शेजारच्या राज्यातून नेते आणि पदाधिकारी सभेला आले. त्यातून पक्षाची संघटन शक्ती दिसून आली आहे. याचा पुढील निवडणुकांमध्ये पक्षाला निश्चित लाभ होईल, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – तेजस्वी यादव यांचा परदेश दौरा रद्द! बिहारमध्ये महाआघाडीत धुसफूस?
गांधी कुटुंब पक्षाची ऊर्जा
काँग्रेस नेते राहुल गांधी सभास्थळी आल्यानंतर उपस्थितांमध्ये उत्साह संचारला होता. लोकांना संबोधित करण्यासाठी ते उभे राहिल्यानंतरही ‘जोडो जोडो भारत जोडो’ च्या घोषणा दिल्या जात होत्या. राहुल यांचे भाषण संपल्यानंतर बरेच लोक निघू लागले. त्यावरून गांधी कुटुंब हेच काँग्रेसचे ऊर्जास्थान आहे हे स्पष्ट झाले. शिवाय सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांची कार्यकर्त्यांना खटकणारी अनुपस्थिती हेदेखील बरेच काही सांगून गेली.