काँग्रेसचे नेते शक्तीसिंह गोहिल यांनी मंगळवारी (दि. १४ मार्च) केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस दाखल केली. राज्यसभेत बोलत असताना पियुष गोयल यांनी सोमवारी (दि. १३ मार्च) राहुल गांधींनी लंडन येथे केलेल्या वक्तव्यांवर टीका केली होती. गोयल यांनी टीका करत असताना राहुल गांधी यांचे नाव घेतले नव्हते. मात्र त्यांच्या टीकेचा रोख राहुल गांधींच्या विरोधात होता, हे स्पष्ट होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेस नेते गोहिल यांनी सभापतींच्या नियम १८८ अंतर्गत ही नोटीस दाखल केली. त्यात त्यांनी म्हटले की, पियुष गोयल यांनी नियम २३८ चे उल्लंघन केले आहे. या नियमानुसार राज्यसभा वगळता इतर कोणत्याही सभागृहाच्या सदस्याविरोधात मानहानीकारक किंवा गुन्हेगारी स्वरूपाचा कोणताही आरोप करता येत नाही. गोहिल म्हणाले की, पियुष गोयल यांनी इतर सभागृहाच्या नेत्याने सभागृहाबाहेर व्यक्त केलेल्या काही निरीक्षणाबाबत राज्यसभेत आरोप केले आहेत. नियम २३८ आणि राज्यसभेच्या प्रथा-परंपरेनुसार इतर सभागृहातील सदस्याबाबत या सभागृहात मानहानीकारक उल्लेख करता येत नाही.

“आणखी महत्त्वाचे म्हणजे पियुष गोयल हे वारंवार लोकसभेतील सदस्याबाबत बोलत राहिले आणि सत्य नसलेली तथ्य मांडत राहिले. गोयल यांनी लोकसभेच्या एका सदस्यावर सत्य माहीत नसतानाही टीका केली आणि हेतुपुरस्सर त्यांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला”, असा आरोप गोहिल यांनी यावेळी केला. तसेच हा आरोप करत असताना गोहिल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौऱ्यावर असताना त्यांनी केलेल्या टीकेबाबत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी कधीही आक्षेप घेतलेला नाही. आपल्या नोटीशीमध्ये गोहिल यांनी मागील काही उदाहरणेदेखील दिली आहेत.

गोहिल यांनी नोटीशीत काय म्हटले?

शक्तीसिंह गोहिल यांनी आपल्या नोटीशीमध्ये एक महत्त्वाच्या प्रकरणचा उल्लेख केला. लोकसभेचे माजी सदस्य एन. सी. चॅटर्जी यांनी लोकसभेबाहेर काही विधाने केली होती. त्यानंतर त्यांच्या विधानाचा मुद्दा ११ मे १९५४ रोजी राज्यसभेत उपस्थित झाला, तेव्हा त्या मुद्द्याला परवानगी देण्यात आली नाही. यावेळी त्यांनी १९ जून १९६७ रोजीच्या एका प्रकरणाचाही दाखला देताना राज्यसभेचे तत्कालीन सभापती व्ही. व्ही. गिरी यांच्या एका वक्तव्याचा दाखला दिला. “एका सभागृहाच्या सदस्याने इतर सभागृहातील सदस्याविरोधात आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून टीका करता कामा नये.”

तसेच तिसऱ्या एका उदाहरणात गोहिल यांनी १९८३ त्या एका प्रकरणाकडे लक्ष वेधले. मार्च १९८३ मध्ये, एक राज्यसभेचा सदस्य लोकसभेच्या सदस्याविषयी बोलत होता, त्यावेळी त्याल लालकृष्ण अडवाणी यांनी विरोध दर्शवत सभापतींनी असे आरोप करण्यासाठी परवानगी देऊ नये, अशी मागणी केली. त्यावेळी सभापतींच्या जागेवर असेलल्या उपसभापतींनादेखील या विषयातले गांभीर्य कळले आणि त्यांनी सदर सदस्याला बोलण्याची परवानगी दिली नाही.

काय म्हणाले होते पियुष गोयल?

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता म्हणाले की, एक वरिष्ठ विरोधी पक्षाच्या नेत्याने परदेशात निर्लज्ज पद्धतीने भारताच्या लोकशाहीवर हल्ला केला. विरोधी पक्षाच्या त्या नेत्याने भारतीय सैन्य, संसद, लोकसभा अध्यक्ष, निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था आणि माध्यमांचा परदेशी भूमीवर अवमान केला आहे, असा आरोपही गोयल यांनी केला होता.

गोयल पुढे म्हणाले की, परदेशी भूमीवर भारतीयांच्या भावनांना विरोधी पक्षातील नेत्याने कसे दुखावले हे संपूर्ण देशाने पाहिले. त्यांनी देश आणि प्रत्येक भारतीयांची दिलगिरी व्यक्त केली पाहीजे. त्यांनी सैन्याची माफी मागितली पाहीजे. तसेच त्यांनी सभागृहात यावे आणि लोकशाही, माध्यमे आणि न्यायपालिका यांच्यावर केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त करावी.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress gives notice for breach of privilege against piyush goyal kvg