मधु कांबळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने सुनावलेली शिक्षा आणि त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाचे जोरदार समर्थन करण्यासाठी ओबीसी अपमानाचा मुद्दा उपस्थित करुन काँग्रेसची कोंडी करणाऱ्या भाजपचा ओबीसींच्या प्रश्नांवरच मुकाबला करण्याची तयारी काँग्रेसने केली आहे.

भाजप ओबीसींच्या अपमानाचा मुद्दा पुढे करुन अदानी घोटाळयावरुन जनतेचे लक्ष विचलीत करु पहात आहे, त्यांच्या या ढोंगीपणाचा पर्दाफाश करण्याची व वस्तुस्थिती लोकांसमोर मांडण्याची रणनीती अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या स्तरावर आखण्यात येत आहे. या मुद्द्यावर आंदोलनाची राज्यस्तरावरही आखणी व नियोजन करण्याच्या सूचना काँग्रेस समितीने प्रदेशाध्यक्ष व वरिष्ठ नेत्यांना दिल्या आहेत.

हेही वाचा… सम्राट अशोक कुणाचे? ओबीसी समूहाची मते मिळवण्यासाठी भाजपा – जेडीयूमध्ये रस्सीखेच, अमित शहांच्या दौर्‍याकडे लक्ष

राहुल गांधी यांना सूरत न्यायालयाने मोदी अडनावाचा उल्लेख करुन केलेल्या अवमानकारक विधानाबद्दल दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. त्या आधारावर लोकसभा सचिवालयाने त्यांची तत्काळ खासदारकीही रद्द केली. त्याविरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात देशभर आंदोलन सुरु केले. मात्र त्याचवेळी भाजपनेही त्याला तेवढ्याच आक्रमकतेने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. भाजपने त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजातील असून, राहुल गांधी यांनी समस्त ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा मुद्दा पुढे करुन काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. या मुद्यावर काहिसे पिछाडीवर जावे लागलेल्या काँग्रेसने राहुल गांधी यांनी संसदेत आणि संसदेच्या बहेर उपस्थित केलेल्या अदानी घोटाळ्याचा विषय तितकाच जोरकसपणे पुढे आणून, भाजपला घेरण्याची मोहिमच उघडली आहे.

हेही वाचा… बिल्किस बानो प्रकरणातील आरोपी आणि भाजपाचे खासदार-आमदार एकाच मंचावर; मुस्लीम समाजात नाराजी

परंतु कर्नाटक विधानसभा निवडणुकीला तातडीने सामोरे जावे लागणाऱ्या काँग्रेसला भाजपने ओबीसी अपमानाचा राहुल गांधी यांच्या विरोधात सुरु केलेल्या प्रचाराकडे दुर्लक्ष करता येणार नाही. २०१९ मधील लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान कर्नाटकमध्येच राहुल गांधी यांनी मोदी अडनाबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे भाजप कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ओबीसी अपमानाचा मुद्दा उपस्थित करुन काँग्रसची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार, त्याला प्रत्यु्तर देण्याची तयारी काँग्रेसने सुरु केली आहे. या संदर्भात अखिल भारतीय काँग्रेस समितीने २८ मार्चला सर्व राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना व वरिष्ठ नेत्यांना पत्रे पाठवून ओबीसीच्या मुद्यावर भाजपचा मुकाबला करण्यासाठी त्या-त्या राज्यांनी स्वंतत्र रणनीती तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार राज्यातील वरिष्ठ नेत्यांमध्ये त्याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा… कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांवरून जळगावमध्ये नेतेमंडळींची कसोटी

या संदर्भात काँग्रेस नेते व माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, राहुल गांधी यांच्यावर जो अन्याय केला गेला, तो झाकण्यासाठी भाजपने ओबीसीच्या अपमानाचा मुुद्द पुढे करुन खोटा प्रचार सुरु केला आहे. बॅंका लुटून पळून गेलेल्या नीरव मोदी व ललित मोदी यांच्या संदर्भात राहुल गांधी यांनी विधान केले होते, आता भाजपला जर हे दोन मोदी ओबीसींचे नेते वाटत असतील तर त्यांनी त्यांची छायाचित्रे आपल्या घरात व पक्ष कार्यालयांत लावून त्यांची पुजा करावी आमचे काही म्हणणे नाही. मात्र ओबीसी समाज भाजपच्या खोट्या प्रचाराल बळी पडणार नाही, असा दावा त्यांनी केला.

हेही वाचा… काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची गृहजिल्ह्यातील आंदोलनाकडे पाठ!

राहुल गांधी यांची कोलारमध्येच पहिली सभा

२०१९ च्या लोकसभा निवडणृूक प्रचाराच्या कर्नाटकमधील कोलार येथील सभेत राहुल गांधी यांनी मोदी अडनावाबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यावरुन त्यांना न्यायालयाने शिक्षा ठोठवली व त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. भाजपकडून त्यांच्याविरोधात ओबीसी अपमाननाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. तर राहुल गांधी त्याच कोलारमधून कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराला प्रारंभ करणार आहेत, भाजपच्या खोट्या प्रचाराचा ते पर्दाफाश करतील, असे प्रदेश काँग्रेसमधून सांगण्यात आले.