पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी गुजरातमधील राजकोट येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीवर निशाणा साधला. मोदी म्हणाले, काँग्रेसने माझ्यावर टीका करण्याचं कंत्राट दुसऱ्याला दिलं आहे आणि काँग्रेस शांतपणे आपलं काम करत आहे.

पंतप्रधान मोदींनी यावेळी भाजपा कार्यकर्त्यांना काँग्रेसपासून सावध राहण्याचा इशाराही दिला. मोदी म्हणाले, “मागील २० वर्षांत गुजरातच्या विरोधता असलेल्यांनी राज्याची बदनामी करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्यांनी मला ‘मौत का सौदगार’ असं म्हणत टीकाही केली.”

याशिवाय आम आदमी पार्टीचं आणि काँग्रेसचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधत मोदी म्हणाले, ते(काँग्रेस) अचानक शांत झाले आहेत. त्यांनी गोंधळ घालणे आणि माझ्यावर टीका करण्याचं कंत्राट दुसऱ्यांना(आप) दिलं आहे. ते शांतपणे गावांमध्ये जात आहेत आणि लोकांना मत मागत आहेत.

पंतप्रधान मोदी लोकांना उद्देशून म्हणाले की, “काँग्रेस नेत्यांना विचारा की तुम्ही भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सन्मानार्थ गुजरातमध्ये उभारलेला स्टॅच्यू ऑफ यूनिटी पाहाण्यास गेला होता का?, जी लोकं सरदार वल्लभभाई पटेलांचा सन्मान करत नाहीत, त्यांना गुजरातमध्ये कोणतेही स्थान मिळाले नाही पाहिजे. जर सरकार भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कारवाई करत आहे, तर एक गट आमच्याविरोधात ओरडत आहे. मग मी लोकांना लुटणाऱ्यांविरोधात कारवाई करू नये का?”

Story img Loader