अकोला : विधानसभा निवडणुकीमध्ये अकोट मतदारसंघात काँग्रेसने गणगणे परिवारावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. ॲड. महेश गणगणे यांना अकोटमधून काँग्रेसने दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरवले. गणगणे कुटुंबात काँग्रेसने सातव्यांदा तिकीट दिले. अकोट मतदारसंघासह जिल्ह्यातील गठ्ठा मतदार लक्षात घेता माळी समाजाला प्रतिनिधित्व दिले. राजकीय समीकरणावर त्याचा मोठा प्रभाव पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी शनिवारी जाहीर केली. यामध्ये अकोट मतदारसंघातून उमेदवारीची माळ महेश गणगणे यांच्या गळ्यात टाकण्यात आली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अकोटमध्ये काँग्रेस उमेदवार संजय बोडखे यांना २७ हजार ६७९ मते मिळाली होती. पक्ष चौथ्या क्रमांकावर घसरला होता. त्यामुळे काँग्रेसने यावेळेस उमेदवार बदलला. काँग्रेसकडून लढण्यासाठी चार ते पाच जण इच्छूक होते. त्यातील महेश गणगणे यांनी गेल्या काही महिन्यांपासून तयारी सुरू केली. या अगोदर २०१४ मध्ये महेश गणगणे यांनी अकोटमधून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढली होती. त्यावेळी त्यांना दुसऱ्या क्रमांकाची ३८ हजार ६७५ मते मिळाली होती. माजी मंत्री सुधाकरराव गणगणे यांचे ॲड. महेश हे पूत्र आहेत. अकोट मतदारसंघातून सुधाकरराव गणगणे १९७८ व १९८५ च्या निवडणुकीत विजयी झाले आहेत, तर १९९०, १९९५, २००९ च्या निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. गणगणे कुटुंबात काँग्रेसने अकोटमधून सातव्यांदा उमेदवारी दिली. अकोट मतदारसंघासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी माळी समाजाचे गठ्ठा मतदार असून ओबीसींचे ज्येष्ठ नेते म्हणून सुधाकरराव गणगणे ओळखले जातात. हे लक्षात घेता अकोटमध्ये काँग्रेसने माळी समाजाला प्रतिनिधित्व दिले. ओबीसी मतपेढी पक्षाकडे वळवण्याचे काँग्रेसचे प्रयत्न आहेत. काँग्रेसने अकोटमधून ॲड. महेश गणगणे यांना निवडणूक रिंगणात उतरवून भाजप व वंचित आघाडीपुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे.

मविआतील जागा वाटपाचे चित्र स्पष्ट

मविआमध्ये अकोट मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला होता. शिवसेनेतील इच्छूक हा मतदारसंघ पक्षाकडे घेण्यासाठी आग्रही होते. अकोट मतदारसंघावरून मविआमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू होती. अखेर काँग्रेसने अकोट मतदारसंघ कायम राखत अकोला पूर्व शिवसेना ठाकरे गटाला दिला आहे. मविआमध्ये जिल्ह्यातील पाच मतदारसंघांपैकी काँग्रेस व शिवसेना प्रत्येकी दोन, तर राष्ट्रवादी पवार गट एक मतदारसंघात निवडणूक लढत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress has given ticket for the seventh time to the gangane family in akot akola district print politics news asj