काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन आज नागपूरमध्ये साजरा होत असतानाच, राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेचा समारोप मुंबईत होत असल्याने काँग्रेस पक्षाने महाराष्ट्राला अधिक प्राधान्य दिले असल्याचे अधोरेखित होते. महाराष्ट्र हा काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला होता. राज्य विधानसभेच्या २८८ पैकी २०० पेक्षा अधिक जागा काँग्रेसच्या निवड़ून येत असत. काँग्रेसचे राज्याच्य सहकार चळवळीत मक्तेदारी होती. १९९० पर्यंत राज्यात काँग्रेसची एकहाती सत्ता होती. यानंतर मात्र महाराष्ट्रात काँग्रेसची धसरण होत गेली. १९९५ मध्ये सत्ता गमवावी लागली. १९९९ ते २०१४ या काळात राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरील आघाडीत पक्ष सत्तेत होता. २०१४ मध्ये काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर तर २०१९ मध्ये चौथ्या क्रमांकावर गेला. लोकसभेच्या ४८ पैकी २०१४ मध्ये फक्त दोन तर गेल्या वेळी जेमतेम एक जागा मिळाली होती.
हेही वाचा : कर्नाटक : “येडियुरप्पांच्या सरकारमध्ये ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार”, यत्नल यांच्या आरोपामुळे भाजपा अडचणीत!
यंदा मात्र काँग्रेसची महाराष्ट्रावर मदार दिसते. लोकसभेच्या ८० जागा असलेल्या उत्तर प्रदेशात काँग्रेसची ताकद नगण्य आहे. बिहारमध्ये नितीशकुमार-लालू प्रसाद यादव यांच्या आघाडीत काँग्रेसला फार कमी जागा लढण्यासाठी वाट्याला येतील. मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आदी राज्यांमध्ये काँग्रेसला फार काही यशाची अपेक्षा नाही. यातूनच उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रावर काँग्रेसची सारी मदार दिसते. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर हे दोन्ही पक्ष पूर्वीएवढे ताकदवान राहिलेले नाहीत. भाजपला आव्हान म्हणून काँग्रेस ही जागा भरून काढण्याचा प्रयत्न करीत आहे. अलीकडेच एका वृत्तवाहिनीने केलेल्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणात राज्यात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला आहे.
हेही वाचा : धर्मांतर केलेल्या आदिवासींचा ‘अनुसुचित जमातीचा’ दर्जा रद्द होणार?
राज्यात काँग्रेसला वातावरण अनुकूल असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे म्हणणे आहे. फक्त जागावाटप हा कळीचा मुद्दा असेल. शिवसेनेच्या ठाकरे गटाने २३ जागा लढणारच असे सांगण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीची ताकद घटली तरी शरद पवार जास्त जागा पदरात पाडून घेतल्याशिवाय राहणार नाहीत. यामुळेच काँग्रेसच्या वाट्यासा किती आणि जिंकण्याची शक्यता असलेल्या जागा येतात की नाही यावर सारे अवलंबून आहे. नागपूरमध्ये काँग्रेस वर्धापनदिनाचा कार्यक्रम साजरा होत असल्याने विदर्भात वातावरणनिर्मितीस पक्षाला संधी मिळेल. याशिवाय लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी यांच्या यात्रेचा समारोप मुंबईत होणार असल्याने मुंबई व राज्यातही राजकीय चित्र बदलण्याची काँग्रेसला संधी आहे.