मोहन अटाळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती : राजकारणात अनेक मातब्‍बर चेहरे देणाऱ्या अमरावती लोकसभा मतदार संघात उमेदवारीवरून महाविकास आघाडी आणि महायुतीतही पेचप्रसंग निर्माण होण्‍याची शक्‍यता आहे. माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍या अमरावती दौऱ्यादरम्‍यान काँग्रेसनेही या मतदार संघावर दावा ठोकला आहे. अमरावती लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे अनंत गुढे हे तीन तर आनंदराव अडसूळ हे दोन वेळा खासदार होते. अमरावती शिवसेनेचा बालेकिल्‍ला आहे, त्‍यामुळे आगामी निवडणुकीत या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार लढणार असल्‍याचे उद्धव ठाकरे यांनी जहीर केले असले तरी अमरावती लोकसभा काँग्रेसला मिळावी, अशी आग्रही मागणी आमदार यशोमती ठाकूर आणि इतर काँग्रेसच्‍या नेत्‍यांनी केली.

महाविकास आघाडीत अमरावती लोकसभा मतदार संघ काँग्रेसला मिळावा, अशी भूमिका यशोमती ठाकूर यांनी मांडली आहे. विद्यमान खासदार नवनीत राणा या काँग्रेस आणि राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या पाठिंब्‍यावर निवडून आल्‍या होत्‍या, त्‍यांनी भाजपला पाठिंबा देऊन विश्‍वासघात केला. मात्र, या मतदार संघात काँग्रेसचे मतदान जास्‍त आहे, त्‍यामुळे तो काँग्रेसकडेच राहावा, असे मत यशोमती ठाकूर यांनी व्‍यक्‍त केले आहे.

निवडणुकीला अवकाश असला, तरी दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि आपण अमरावती जिल्‍ह्यातील शिवसैनिकांच्‍या संपर्कात आहोत. युतीमध्‍ये अमरावती लोकसभा मतदारसंघ गेल्‍या कित्‍येक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्‍ला राहिलेला आहे. त्‍यामुळे अमरावती लोकसभेचा खासदार शिवसेनेचाच होणार, असा दावा शिवसेनेच्‍या शिंदे गटाचे नेते माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी केला आहे. आनंदराव अडसूळ आणि राणा दाम्‍पत्‍यात समेट घडून आल्‍याची चर्चा बिनबुडाची असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे. त्‍यामुळे महायुतीतही या मतदार संघात स्‍पर्धा दिसून येणार आहे.

पंचेचाळीस वर्षे काँग्रेसचे वर्चस्‍व राहिलेल्‍या अमरावती मतदार संघात १९९६ पासून बावीस वर्षे शिवसेनेचा आवाज होता. गेल्‍या निवडणुकीत नवनीत राणा यांनी ही जागा सेनेकडून खेचून घेतली. १९९१ च्‍या निवडणुकीत येथे काँग्रेसचे पंजा हे पक्षचिन्‍ह दिसले, तेव्‍हापासून येथे काँग्रेसचा उमेदवार नाही, हे शल्‍य काँग्रेसच्‍या नेत्‍यांना आहे. स्‍वातंत्र्यानंतर सी.पी. अँड बेरार प्रांत असतानाही तत्कालीन कॉँग्रेसचे नेते डॉ. पंजाबराव देशमुख आणि के. जी. देशमुख हे दोन खासदार या मतदारसंघातून निवडून गेले होते. १९५७ पासून १९९६ पर्यंत या मतदारसंघातून कॉँग्रेसने सलग सात निवडणुका जिंकल्या. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सुदाम देशमुख यांनी १९८९ मध्ये काँग्रेसच्या विजयी घौडदौडीला लगाम लावला. ते दोन लाख मताधिक्याने निवडून आले होते. त्यानंतर शिवसेनेच्या अनंत गुढेंना तीन वेळा, रिपाइंचे रा. सू. गवई यांना एक वेळा तर आनंदराव अडसूळ यांना दोन वेळा अमरावतीकरांनी खासदार केले. १९९९ पासून शिवसेनेने सलग चार वेळा हा मतदारसंघ राखल्याने सेनेचा हा बालेकिल्ला म्हणून उदयास आला.

काँग्रेसला आता अमरावती मतदार संघातील जनाधार सिद्ध करण्‍याचे वेध लागले आहेत. काँग्रेसच्‍या पाठिंब्‍यावर गेल्‍या निवडणुकीत नवनीत राणा निवडून आल्‍या. देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असतानाही अमरावतीत मात्र वेगळे चित्र दिसले. त्‍यानंतर झालेल्‍या विधानसभेच्‍या निवडणुकीत विपरित परिस्थितीतही काँग्रेसचे तीन आमदार निवडून आले. भाजपला चांगली कामगिरी करता आली नाही. भाजपचा केवळ एक आमदार निवडून आला. शिवसेनेचा जिल्‍ह्यात एकही आमदार नाही. अशा स्थितीत महाविकास आघाडीकडून अमरावतीत काँग्रेसला संधी मिळावी, ही मागणी समोर आली आहे. काँग्रेसच्‍या नेत्‍यांनी त्‍यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.

माजी खासदार आनंदराव अडसूळ हे शिंदे गटात सामील झाले असले, तरी उद्धव ठाकरे गटाकडे माजी खासदार अनंत गुढे यांच्‍यासह अनेक जुने पदाधिकारी टिकून आहेत. महाविकास आघाडीत उमेदवारी मिळवण्‍यासाठी वेगवेगळे गट कामाला लागले आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress in front of thackeray group embarrassment in amravati print politics news ysh
Show comments