आगामी लोकसभा आणि विधानसभेची निवडणुका लक्षात घेता, काँग्रेसने राष्ट्रीय कार्यकारिणीत काही बदल केले आहेत. काँग्रेसने देशातील वेगवेगळ्या नेत्यांना आपल्या कार्यकारिणीत स्थान दिले आहे. आगामी निवडणुकांत चांगली कामगिरी कशी करता येईल आणि त्यासाठी कार्यकारिणीतील नेत्यांची कशी मदत होईल, याचा विचार करूनच या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, अवघ्या काही महिन्यांत राजस्थानमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे जातीय समतोल साधण्यासाठी काँग्रेसने येथील मंत्री तथा काँग्रेसचे उपाध्यक्ष महेंद्रजितसिंह मालवीय यांना कार्यकारिणीत स्थान दिले आहे.
मीना यांच्याऐवजी मालवीय यांना संधी
मालवीय हे मेवाड प्रांतातील बागीदोरा मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच राजस्थानच्या सरकारमध्ये ते जलसंपदा मंत्री आहेत. याआधी अनुसूचित जमाती समाजाचे प्रतिनिधित्व करणारे माजी खासदार रघुवीर मीना यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले होते. मात्र, नव्याने जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत त्यांचे नाव वगळण्यात आले असून, त्याऐवजी मालवीय यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. मीना हे १९९३, २००९ या काळात एकूण चार वेळा आमदार राहिलेले आहेत. त्यांनी २००९ व २०१४ साली त्यांनी खासदारकीही भूषवलेली आहे.
मेवाड भाग काँग्रेस, भाजपाला महत्त्वाचा?
राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीसाठी मेवाड हा प्रांत राजकीय दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. याच कारणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधारण एका वर्षात मेवाड, तसेच मेवाडच्या आजूबाजूच्या प्रांतात एकूण चार वेळा भेट दिलेली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीदेखील मेवाडमधील मानगड धाम या भागाला भेट देत सभेला संबोधित केले होते. मेवाड प्रांतात काँग्रेसच्या तुलनेत भाजपाची ताकद जास्त आहे, असे म्हटले जाते. मात्र, आगामी निवडणुकांत समतोल साधता यावा, तसेच मेवाड प्रांतात पक्षाचा जास्तीत जास्त विस्तार व्हावा म्हणून मालवीय यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
मेवाड प्रांतात कोणाचे प्राबल्य?
मेवाड प्रांतात सहा जिल्ह्यांतील एकूण ३१ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. याआधीच्या निवडणुकीत ३१ पैकी १७ जागांवर भाजपा, १२ जागांवर काँग्रेसचा व एका जागेवर अपक्ष आमदाराचा विजय झालेला आहे. राजस्थानमध्ये एकूण २५ जागा या अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत. आरक्षित जागांपैकी एकूण १२ जागा या मेवाड प्रांतातील सहा जिल्ह्यांतल्या आहेत.
मालवीय यांची राजकीय कारकीर्द
मालवीय २००८ साली पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी जनता दल पक्षाच्या जितमल खांत यांना ४५ हजार मतांनी पराभूत केले होते. २००३ साली खांत यांनी मालवीय यांना सहा हजार मतांनी पराभूत केले होते. २०१३ साली मतदारांमध्ये सत्ताविरोधी भावना निर्माण झालेली असूनही मालवीय यांनी विजय मिळवला होता. त्यांनी भाजपाचे उमेदवार खेमराज गारासिया यांना पराभूत केले होते. २०१८ साली पुन्हा एकदा त्यांनी गारासिया यांना पराभूत केले.
२०२० सालच्या बंडखोरीत मालवीय चर्चेत
२०२० साली अशोक गेहलोत यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. टोंक मतदारसंघाचे आमदार सचिन पायलट यांनी आपल्या आमदारांसह बंडखोरी केली होती; मात्र हा प्रयत्न फसला होता. या बंडखोरीत मालवीय यांचेही नाव आले होते. त्या काळात एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये मालवीय सुरुवातीला पायलट यांच्या गटात होते; मात्र त्यांनी ऐन वेळी भूमिका बदलली, असा दावा करण्यात आला होता. दुसरीकडे मालवीय यांनी हा दावा फेटाळला होता. मी कायम गेहलोत यांचाच समर्थक आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते.
काँग्रेसने आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत जर्व जातींच्या नेत्यांना स्थान दिले आहे. काँग्रेसने जातीय आणि प्रांतीय समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.