चंद्रपूर : जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारपूर, चिमूर व वरोरा या चार मतदारसंघांसाठी काँग्रेस आग्रही असून येथील इच्छुक उमेदवारांसह नेत्यांनी दिल्लीत तळ ठोकला आहे.

अनुसूचित जातीसाठी राखीव चंद्रपूर तथा बल्लारपूर या दोन मतदारसंघांवर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दावा केला आहे. अपक्ष आमदार किशाेर जोरगेवार यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र काँग्रेस ही जागा सोडण्यास तयार नाही. सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत भाजपाचा प्रचार करणाऱ्या जोरगेवार यांच्यासाठी मते कशी मागायची, असा प्रश्न खासदार प्रतिभा धानोरकर यांनी थेट पक्षश्रेष्ठींना विचारला आहे. जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी आघाडीचा धर्म पाळू, मात्र चंद्रपूरची जागा राष्ट्रवादीला सोडण्यास तीव्र शब्दात नकार दिला आहे. येथे दलित समाजाचा उमेदवार द्या, पण इतर पक्षाला ही जागा सोडू नका, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांची आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेतल्यामुळे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शहराध्यक्ष दीपक जयस्वाल व कार्याध्यक्ष बेबी उईके हेही नाराज आहेत.

हेही वाचा >>>कोल्हापुरात ‘महायुती’ – ‘मविआ’त बंडखोरीची लागण

बल्लारपूर मतदारसंघावर शरद पवार गटासोबतच शिवसेना ठाकरे गटानेही यांनी दावा केला आहे. येथून ठाकरे गटाचे संदिप गिऱ्हे निवडणूक लढण्यास तयार आहेत. शरद पवार गटाकडून राजेंद्र वैद्य स्वत: निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे चंद्रपूर व बल्लारपूर या जागांवरून महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला आहे. वरोरा व चिमूर या दोन्ही जागा शिवसेनेने मागितल्या आहेत. यामुळे काँग्रेस नेते चांगलेच संतापले आहेत.

हे चारही काँग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ आहेत. बल्लारपूर व चंद्रपूर मतदारसंघांत मागील तीस वर्षांपासून काँग्रेस उमेदवाराचा सातत्याने पराभव झाला असला तरी येथे काँग्रेसचे गठ्ठा मतदार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकही मतदार संघ राष्ट्रवादी व शिवसेनेला सोडू नये, अशी आग्रही भूमिका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. दिल्लीला गेलेल्या काँग्रेस शिष्टमंडळाने राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेश प्रभारी चेन्नीथला यांची भेट घेत ही मागणी रेटली आहे. मित्रपक्षाला जागा सोडल्यास त्याचा परिणाम महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांवर होईल, असेही पटवून दिले आहे.