अनिकेत साठे
नाशिक: विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडून काँग्रेस आणि पर्यायाने महाविकास आघाडीची कोंडी झाली आहे. या जागेवर महाविकास आघाडीच्यावतीने काँग्रेसने पुन्हा डॉ. सुधीर तांबे यांना रिंगणात उतरविले होते. परंतु, अखेरच्या क्षणी त्यांनी अर्ज दाखल केला नाही. त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करीत आपणच महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचा दावा केला. डॉ. तांबे यांनी तरुणांना संधी देण्याची मागणी पक्षाकडे केली होती. पण, ती अव्हेरली गेली. मुलाच्या प्रचारार्थ सर्व राजकीय पक्षांचे सहकार्य घेण्याचे संकेत देत डॉ. तांबे यांनी काँग्रेसची कोंडी केल्याचे चित्र आहे. या घोळा मागेही भाजपची खेळी असल्याची चर्चा होत आहे. कारण भाजपनेही अधिकृत उमेदवार उभा केलेला नाही.
हेही वाचा... उमेदवारी अर्जाच्या गोंधळाची राज्यात जुनीच परंपरा
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवाराविषयी उत्सुकता ताणली गेली. या जागेसाठी काँग्रेसने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. ते अर्ज भरतील, अशी अपेक्षा असताना त्यांनी मुलगा सत्यजितसाठी माघार घेत अर्जच दाखल केला नाही. सत्यजित तांबे यांनी काँग्रेस आणि अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. पण त्यांच्याकडे पक्षाचा एबी अर्ज नव्हता. भाजपकडून त्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न झाले होते. परंतु, त्यांनी भाजपची उमेदवारी न घेता खुष्कीचा मार्ग स्वीकारला. तांबे कुटुंबियांनी एकत्रितपणे सत्यजित यांना निवडणुकीत उतरविण्याचे ठरवले. याबाबत सत्याजित यांचे मामा व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केली नसल्याचे डॉ. सुधीर तांबे यांनी सांगितले. युवकांना वाव देण्यासाठी पक्षाने सत्यजित यांना उमेदवारी देण्याचा आग्रह आपण धरला होता. त्यांच्याकडे जिल्हा परिषदेतील कामाचा १० वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे ते विधान परिषदेत चांगले काम करतील हे पक्षाला कळविले होते. परंतु, काँग्रेसने त्यांच्याऐवजी आपल्याच नावाने दोन एबी अर्ज पाठवले. आपल्याऐवजी सत्यजितचा अर्ज भरण्यापूर्वी पक्ष नेतृत्वाला कल्पना दिली. पक्षशिस्त मोडल्याबद्दल कारवाई होणार नाही. आपण तीन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्या निवडणुकीत सर्वपक्षीयांची मदत मिळाली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
हेही वाचा… महाविकास आघाडीचा निर्णय शिक्षक संघटनांनी धुडकावला
सत्यजित तांबे यांनी आपण अपक्ष म्हणून अर्ज भरला असला तरी महाविकास आघाडीचेच उमेदवार असल्याचा दावा केला. निवडणुकीत सर्व पक्षांचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. भाजपने त्यांच्यासाठी उमेदवारी अर्ज तयार ठेवल्याची चर्चा होती. परंतु, या संदर्भात भाजपशी चर्चा झाली नाही. अर्जाबाबत कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आपल्यावर प्रेम असल्याने भाजपनेही आपणास पाठिंबा द्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा… लातूरमधील राजकीय संभ्रमाला पूर्णविराम
या मतदारसंघात भाजपने अधिकृत उमेदवार दिलेला नाही. धनंजय विसपुते हे भाजपकडून प्रबळ दावेदार होते. त्यांनी भाजपचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला असला तरी पक्षाचा एबी अर्ज नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे वरिष्ठांकडून आदेश आल्यास ते अर्ज माघारी घेऊ शकतील. ऐनवेळी घोळ करून महाविकास आघाडीची कोंडी करण्याची भाजपची रणनीती यामागे असल्याची चर्चा होत आहे. या घोळात दडलेली गुपिते कालांतराने समोर येतील. पण तूर्तास डॉ. सुधीर तांबे यांनी अखेरच्या क्षणी माघार घेऊन कांँग्रेस व महाविकास आघाडीला कोणताही पर्याय देता येणार नसल्याची व्यवस्था केल्याचे दिसत आहे.