हरियाणा राज्यात प्रादेशिक तसेच राज्य पातळीवरील पक्ष आगामी लोकसभा तसेच ऑक्टोबर २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. काँग्रेस पक्षाने जनतेशी संपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. विरोधी पक्षनेते तथा दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले भूपिंदरसिंह हुडा यांनी काँग्रेसची आगामी रणनीती, आप पक्षाबद्दलची भूमिक याविषयी सविस्तर भाष्य केले आहे. ते ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलत होते.
“आम्ही लवकरच राज्यभर दौरा करणार”
यावेळी बोलताना त्यांनी २०२४ साली होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या तयारीवर भाष्य केले. “या निवडणुकीसाठी काँग्रेसची पूर्ण तयारी झालेली आहे. १ नोव्हेंबर रोजी आम्ही आमच्या दौऱ्यांना सुरुवात करणार आहोत. या दौऱ्यामध्ये मी आणि आमचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उदयभान राज्यभर दौरा करणार आहोत. या दौऱ्याची सुरुवात यमुनानगर जिल्ह्यातील रादौर या मतदारसंघापासून होणार आहे. आम्ही प्रत्येक मतदारसंघाला भेट देणार आहोत. आम्ही याआधीच सर्व लोकसभा मतदारसंघांचा दौरा केलेला आहे. या दौऱ्यात आम्हाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. लवकरच मी आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढावे म्हणून राजस्थानचाही दौरा करणार आहे,” असे हुडा यांनी सांगितले.
हेही वाचा >>>छत्तीसगडमध्ये भाजपाकडून दंगलखोर, धर्मांतरविरोधी उमेदवारांना तिकीट; काँग्रेसविरोधात हिंदुत्वाचा प्रयोग
“जागावाटप करताना निकष असावेत”
आम आदमी पार्टी (आप) हा पक्ष हरियाणातील विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, आप तसेच इतर पक्ष इंडिया आघाडीच्या रुपात एकत्र आलेले आहेत. याच कारणामुळे आप पक्षासोबतच्या जागावाटपाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यावरही हुडा यांनी भाष्य केले. “हरियाणात सरकार स्थापन करण्यास आम्ही सक्षम आहोत. लोकसभा निवडणुकीचा विचार करायचा झाल्यास पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर जागावाटपावर हायकमांड निर्णय घेईल. इंडिया आघाडीत जागावाटप करताना काहीतरी निकष असायला हवेत. एखाद्या पक्षाचे विशिष्ट मतदारसंघात प्राबल्य नसेल, तर अशा पक्षाला कोणत्या आधारावर ती जागा लढवू द्यावी? काही हजार मते मिळवल्यानंतर कोणीही लोकसभा निवडणुकीत एखादी जागा लढवण्याचा दावा करू शकत नाही,” असे हुडा यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>>काकांच्या सावलीतील पुतण्या…
“सत्तेत आल्यास चार उपमुख्यमंत्री”
काँग्रेस सत्तेत आल्यास आम्ही हरियाणा राज्याला चार उपमुख्यमंत्री देऊ, असे हुंडा यांनी जाहीर केलेले आहे. या घोषणेवरही त्यांनी भाष्य केले. “मी कोणतीही नवी घोषणा केलेली नाही. २०१९ सालच्या निवडणुकीतही मी अशीच घोषणा केली होती. आमचे सरकार आल्यास आम्ही एकूण चार उपमुख्यमंत्री देऊ. हे उपमुख्यमंत्री दलित, ब्राह्मण, ओबीसी आणि इतर समाजाचे असतील. आमच्या या घोषणेत चुकीचे काय आहे. आम्ही प्रत्येक जातीला प्रतिनिधित्व देत आहोत,” असे हुडा म्हणाले.