महेश सरलष्कर

‘खादीपासून तयार केलेला राष्ट्रीय तिरंगा फडकावून ‘भारत जोडो यात्रे’ची सुरुवात केली जाईल. यात्रेत `मेड इन चायना’वाला पॉलिएस्टर ध्वज नसेल. तेव्हा खरा राष्ट्रवाद आणि बनावट राष्ट्रवादातील फरक कळेल’, असे काँग्रेसचे माध्यमप्रमुख जयराम रमेश यांनी सोमवारी ‘भारत जोडो’ यात्रेची माहिती देताना सांगितले. या यात्रेचा संबंध खादी आणि स्वदेशी वस्तूंशी जोडून काँग्रेसने बुधवारपासून सुरू होणाऱ्या ‘भारत जोडो’ची तुलना गांधीजींच्या पदयात्रांशी करण्याचा प्रयत्न केला आहे.

स्वातंत्र्यलढ्यामध्ये महात्मा गांधींनी पदयात्रा काढून देशभर भ्रमण केले, लोकांना स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी होण्यास उद्युक्त केले. स्वदेशीचा नारा दिला, चरखा चालवला, खादी उद्योगाला प्रोत्साहन मिळाले. काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेत यापैकी काहीही होणार नसले तरी, राष्ट्रवादाचा मुद्दा ठसवण्यासाठी खादीचा तिरंगा फडकावला जाणार आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्र सरकारने ‘घराघरात तिरंगा’ हा कार्यक्रम राबवला होता. त्यावेळी तिरंग्यावरून बरीच चर्चा झाली होती.

हेही वाचा- मविप्रतील राजकारण वेगळ्या वळणावर -आर्थिक बेशिस्तीवर शरद पवार नाराज

शिवाय, गांधींजींनी ज्याप्रमाणे लोकांना जोडून घेतले, त्याप्रमाणे काँग्रेसचे ११९ पदयात्री लोकांशी संवाद साधून देश जोडण्याच्या कामात लोकांना सहभागी करून घेण्यासाठी प्रवृत्त करणार आहेत, असा विचार अप्रत्यक्षपणे काँग्रेसकडून मांडला जात आहे. दीडशे दिवस १२ राज्यांतून जाणाऱ्या सुमारे ३ हजार ५७० किमी.च्या पदयात्रेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पूर्णवेळ सहभागी होणार असले तरी, राहुल पदयात्रेचे नेतृत्व करणार नसल्याचे रमेश यांचे म्हणणे आहे. वर्णभेदविरोधी लढ्यातील सेनानी, दक्षिण आफ्रिकेचे ‘गांधी’ संबोधले गेलेले नेल्सन मंडेला यांचे उदाहरण देत रमेश यांनी पदयात्रेचे स्वरूप स्पष्ट केले. ‘मंडेला म्हणत मला भक्त नकोत, माझ्या कार्यात सहभागी होणारे स्वयंसेवक आहेत. त्याच पद्धतीने काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा असून राहुल गांधी अन्य ११८ सहयात्रींप्रमाणे एक असतील, ते नेते नव्हे, स्वयंसेवक असतील, ते लोकांशी संवाद साधतील, त्यांच्या मागण्या-अडचणी ऐकून घेतील’’, असे रमेश यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दररोज २२ किमी…

तामीळनाडूमधून ८ सप्टेंबरला कन्याकुमारीमधील पॉलिटेक्निक महाविद्यालयापासून सकाळी सात वाजता यात्रा सुरू होईल. दररोज सरासरी २२-२३ किमी.ची पदयात्रा होईल. सकाळी ७ ते साडेदहा आणि दुपारी ३ ते साडेसहा अशा दोन टप्प्यांत दररोज यात्रा असेल. सकाळी १५ किमी. तर, संध्याकाळी ८ किमी.चे अंतर कापले जाईल. सकाळच्या सत्रात सुमारे २ हजार लोक सहभागी होणे अपेक्षित आहे. यावेळी लोकांशी चर्चा होईल. विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी भेटू शकतील. चहा-नाश्ता करताना गप्पा होतील. संध्याकाळी मात्र पदयात्रेत २५ हजार लोक सहभागी होऊ शकतील. यावेळी पदयात्रेचे स्वरूप जनसमुहाचे असेल. ‘भारतजोडोयात्रा डॉट इन’वरून यात्रेचे थेट प्रसारण होणार आहे. ‘एक तेरा कदम, एक मेरा कदम, मिल जाए जुड जाए अपना वतन’ असे तीन मिनिटांचे शीर्षक गीतही तयार केले असून प्रत्येक राज्यभाषेत ते प्रसारित केले जाईल. दिल्लीत सोमवारी पत्रकार परिषदेत हिंदी गीत प्रसारित केले गेले.  

‘भारत जोडो’चे तीन उद्देश

आर्थिक विषमता वाढत असून देशामध्ये दुही निर्माण होत आहे. त्यामुळे तुटणाऱ्या भारताला पुन्हा जोडण्याची गरज आहे. सामाजिक ध्रुवीकरणामुळे देशाचे-समाजाचे विभाजन होत आहे आणि कमालीचे राजकीय केंद्रीकरण होत असून राज्यांचे अधिकार काढून घेतले जात आहे. संविधानाचा दुरुपयोग होत आहे. धोरणे- कार्यक्रम पंतप्रधान कार्यालयातून राबवले जात आहे. हे तीनही मुद्दे गंभीर असून लोकांचा आवाज दिल्लीत केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी भारत जोडो यात्रा काढली जात असल्याचे रमेश यांनी सांगितले.

हेही वाचा- पालकमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांच्या सुरस कथा; पालकमंत्रीपदाची घोषणा होण्यापूर्वीच स्वीय सहाय्यक अवतरले

तर मतदानाचीही सुविधा!

भारत जोडो यात्रेच्या काळात काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी गरज असेल तर १७ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्यादिवशी ११९ ‘यात्रेकरू’ कर्नाटकमध्ये असतील. हे यात्रेकरू मतदार असल्याने त्यांना बेंगळुरूमधील प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात मतदान करता येईल, अशी माहिती रमेश यांनी दिली. त्यामुळे राहुल गांधीही कर्नाटकमध्ये मतदान करू शकतील. राहुल गांधी पक्षाध्यक्ष पद स्वीकारण्यास तयार झाले नाही तर, अन्य नेत्याला उमेदवारी दिली जाऊ शकेल, या उमेदवारीला बंडखोर गटातील नेत्यांनी आव्हान दिले तर मतदान घेतले जाईल.

Story img Loader