जालना : काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर आगामी २०२४ मधील लोकसभेची निवडणूक लढविण्यास आपण तयार आहोत, असे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी स्पष्ट केल्याने आगामी निवडणुकीत या दोघांमध्येच लढत होण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्यावतीने शुक्रवारी राज्यात जिल्हापातळीवर या संदर्भात केंद्र सरकारच्या भूमिकेविरुद्ध पत्रकार परिषदा घेण्यात आल्या. त्याचा एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने जालना येथे पत्रकारांच्या प्रश्नास उत्तर देताना, २०२४ ची लोकसभा निवडणूक पक्षाने उमेदवारी दिल्यास तयार असल्याचे सांगितले. २०२४ मध्ये भाजपकडून आपणच उमेदवार असल्याचे संकेत यापूर्वी विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांनी दिले आहेत.
हेही वाचा >>> स्थानिक मुद्दे टाळण्यासाठी ‘मोदी विरुद्ध राहुल’ हीच भाजपची प्रचाराची दिशा
१९९६ पासून झालेल्या सात लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघात काँग्रेसचा सलग पराभव झाला असून भाजपचा उमेदवार निवडून आला आहे. यापैकी दोन निवडणुकांत भाजपच्या तिकिटावरर उत्तमसिंग पवार निवडून आले होते, तर त्यानंतरच्या सलग पाच निवडणुकांत भाजपकडून रावसाहेब दानवे निवडून आले आहेत. सलग सात निवडणुकांत पराभव झाल्याने २०२४ मध्ये काँग्रेसचा भाजपशी कसा निभाव लागेल हा नेहमीच जालना जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय असतो.
हेही वाचा >>> कोल्हापूरातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे राजकारण तापले
२००९ मध्ये कल्याण काळे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढविताना भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना जोरदार टक्कर दिली होती. दानवे तिसऱ्यांदा उमेदवार होते आणि त्याआधी त्यांची लोकसभा सदस्यत्वाची दहा वर्षे झालेली होती. दानवे आणि काळे यांच्यातील ही निवडणूक विषम होईल, असे प्रारंभी वाटत होते. परंतु काळे यांनी शेवटच्या टप्प्यात अनपेक्षित गती घेऊन तीन लाख ४२ हजार २२८ मते मिळविली होती. परंतु दानवे यांना त्यांच्यापेक्षा आठ हजार ४८२ अधिक म्हणजे तीन लाख ५० हजार ७१० मते मिळाली होती. या निवडणुकीत पराभव झाला तरी कल्याण काळे यांनी दिलेल्या लढतीची चर्चा मात्र झाली होती. आता २०२४ साठी काळे यांचे नाव पुन्हा चर्चेस आले आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद मतदारसंघावरही भाजपने जोर लावला आहे. जालना मतदारसंघ कायम राखण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीत औरंगाबाद मतदारसंघ बहुधा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला जाईल. जालन्यात काँग्रेससाठी मोठे आव्हान असेल.