लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या उत्तर प्रदेश राज्यात सत्ता समीकरणं वेगाने बदलत आहेत. काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. उत्तर प्रदेशात सपाने एकतर्फी उमेदवारी घोषित केली आहे. त्यातच धार्मिक पार्श्वभूमी असलेले ज्येष्ठ नेते भाजपशी संधान साधून असल्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत भर पडली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी २०१४ मध्ये संभल आणि २०१९ मध्ये लखनौमधून दोनदा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. संभल जिल्ह्यातील ‘कल्की धाम’ च्या पायाभरणी समारंभाचे निमंत्रण देण्यासाठी कृष्णम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रक्षामंत्री राजनाथ सिंह यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीनंतर ते पंतप्रधानांचे गुणगान गातांना दिसले, यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. मध्यंतरी स्वतःच्याच पक्षातील नेत्यांवर आरोप केल्यामुळे ते चर्चेत आले होते.
भगवान विष्णूच्या अवतारांपैकी एक मानल्या जाणाऱ्या कल्कि अवतराचे संभलमध्ये एक प्राचीन मंदिर आहे. या मंदिराचे रूपांतर तीर्थक्षेत्रात होत असून याचे पीठाधिश्वर आचार्य प्रमोद कृष्णम असणार आहेत. पंतप्रधान मोदी आणि रक्षामंत्री राजनाथ सिंह यांच्या भेटी केवळ कल्की धाम उद्घाटन कार्यक्रमात निमंत्रित करण्यासाठी होत्या आणि त्यांना राजकीय भेटी म्हणून पाहिले जाऊ नये, असे कृष्णम यांनी सांगितले आहे. यावेळी अयोध्या राम मंदिराच्या बांधकामासाठी पंतप्रधानांचे कौतुक करत त्यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण न स्वीकारल्याबद्दल स्वतःच्या पक्षावरही निशाणा साधला.
कृष्णम म्हणाले, “मोदींकडे दैवी शक्ती आहे”. ते म्हणाले की, पंतप्रधानांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी ज्याप्रमाणे काम केले होते, त्याचप्रमाणे सनातन धर्माच्या अनुयायांनी कल्की धामाची पायाभरणी करावी अशी त्यांची इच्छा आहे.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला तसेच राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला उपस्थित न राहण्याच्या निर्णयावर त्यांनी त्यांच्याच पक्षाला लक्ष्य केले. भगवान राम सर्वांचे आहे असे म्हणत त्यांनी पक्षाला राम मंदिराचे निमंत्रण न स्वीकारण्याची चूक सुधारण्यास सांगितली. भारत जोडो न्याय यात्रेकडे पाहता काँग्रेस २०२४ च्या नव्हे तर २०२९ च्या निवडणुकीची तयारी करत असल्याचाही टोला लगावला.
काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले की, प्रियंका गांधी वाड्रा यांना काँग्रेसच्या यूपी प्रभारी म्हणून त्यांच्या भूमिकेत मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पूर्वीच्या उत्तर प्रदेश सल्लागार परिषदेचा कृष्णम एक भाग होते. अगदी पूर्वीपासून ते आपले विचार स्पष्टपणे मांडत आले आहे. सपासह इतर पक्षांच्या नेत्यांशी कृष्णम यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. कृष्णम यांचे लक्ष असलेल्या संभल आणि लखनौ या दोन्ही जागांवर समाजवादी पार्टीने आपले उमेदवार घोषित केल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसने अद्याप समाजवादी पक्षाची यादी स्वीकारली नसून लखनौ येथील उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सपा संभलचे उमेदवार हे या जागेचे विद्यमान खासदार शफीकुर रहमान बारक आहेत. लखनौमध्येही २०१९ मध्ये सपाने चांगले प्रदर्शन केल्यामुळे या दोन्ही जागा त्यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. कृष्णम यांनीही १.८० लाख मतांसह चांगली कामगिरी केली होती. लखनौच्या जागेवर सपाने दिग्गज नेते रविदास महरोत्रा यांचे नाव दिले आहे.
हेही वाचा : राम मंदिर उद्घाटनासाठी उपस्थित राहिल्याबद्दल मुस्लिम धर्मगुरूंविरोधात फतवा; कोण आहेत इमाम उमर अहमद इलियासी?
कृष्णम यांना मिळालेली १.८० लाख मते ही आश्चर्यकारक होती, कारण राज्यात इतरत्र काँग्रेसचा पराभव झाला होता. रायबरेली ही १ जागा काँग्रेसला जिंकता आली. अमेठीमधून उभे असलेले राहुल गांधीही या निवडणुकीत पराभूत झाले होते. मूळचे संभल येथील असलेले आचार्य प्रमोद कृष्णम यांचा निवडणूक रेकॉर्ड फारसा चांगला नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते संभलमध्ये पाचव्या स्थानावर होते, तर २०१९ मध्ये ते तिसर्या स्थानावर होते.