२०२४ साली लोकसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी बाकावरील जवळजवळ सर्वच पक्ष एकत्र आले असून त्यांनी नव्या आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीला विरोधकांनी INDIA (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स) असे नाव दिले आहे. या आघाडीत काँग्रेस आणि पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस या पक्षांचाही समावेश आहे. हे पक्ष राष्ट्रीय पातळीवर एकत्र आले असले तरी पश्चिम बंगालमध्ये मात्र चित्र काहीसे वेगळे आहे. येथे काँग्रेस पक्ष तृणमूलवर सडकून टीका करताना दिसतोय.
विरोधकांच्या बंगळुरू येथील बैठकीनंतर अवघ्या काही दिवसांत पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या दोन पक्षांतील नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. येथे काँग्रेस पक्ष आक्रमक भूमिकेत दिसत आहे. तर तृणमूलने मात्र सध्यातरी सबुरीची भूमिका घेतली आहे. शनिवारी (२२ जुलै ) रोजी याची प्रचिती आली.
“ममता बॅनर्जी यांनी भ्रमनिरास केला”
शनिवारी पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार अधीर रंजन चौधरी यांनी तृणमूल काँग्रेस आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर सडकून टीका केली. “काँग्रेसच्या मदतीने ममता बॅनर्जी २०११ साली सत्तेत आल्या. ही बाब मात्र त्यांनी नाकारलेली आहे. सध्या लोकांचा ममता बॅनर्जी यांनी भ्रमनिरास केला आहे. त्यामुळे आता त्यांना आम्ही काँग्रेसशी युती करायला हवी, असे वाटत आहे. सध्या तृणमूलला काँग्रेसची खूप गरज आहे,” असे अधीर रंजन चौधरी म्हणाले.
“…तर तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडू शकते”
पुढे अधीर रंजन चौधरी यांनी राहुल गांधी तसेच काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे कौतुक केले. “राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण देशाला एकत्र केले. राहुल गांधी यांच्याकडे पाहून देशात नक्कीच परिवर्तन होणार आहे, अशी लक्षणं दिसत आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांच्याशी हातमिळवणी न केल्यास, तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडू शकते, असे ममता बॅनर्जी यांना वाटत आहे,” असा दावाही चौधरी यांनी केला.
“आम्हाला कोणीही दुबळे समजू नये”
चौधरी यांच्या याच टीकेनंतर तृणमूल काँग्रेसचे नेते शंतनू सेन यांनी पलटवार केला. “तृणमूल काँग्रेसने स्वत:च्या बळावर सत्ता स्थापन केली होती. २०११ साली काँग्रेसची दयनीय स्थिती होती. सध्या देशपातळीवर झालेली आघाडी लक्षात घेता आम्ही शांत आहेत. याचा अर्थ आम्ही दुबळे आहोत, असा नाही. आम्ही पश्चिम बंगालमध्ये स्वत:च्या बळावर भाजपाला विरोध करू शकतो. आम्हाला कोणाचीही गरज नाही,” असे शंतनू सेन म्हणाले.
भाजपाची काँग्रेस, तृणमूलवर टीका
काँग्रेस-तृणमूल काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या या वादावर भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी अधिकारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पश्चिम बंगालमध्ये ज्यांना तृणमूल काँग्रेसच्या विरोधात लढायचे आहे, ते आमच्यासोबत येऊ शकतात. किंवा त्यांनी पश्चिम बंगालमधील सरकारविरोधात पूर्ण क्षमतेने लढा देण्यासाठी एखाद्या व्यासपीठाची निर्मिती करावी. बंगळुरू येथील बैठकीत काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो सर्वांनी पाहिलेले आहेत. असे असताना पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस तृणमूल काँग्रेसचा विरोध करत असेल, तर जनता यावर विश्वास ठेवणार नाही. सध्या दिल्लीमध्ये मैत्री आणि बंगालमध्ये युद्ध, अशी त्यांची स्थिती आहे,” अशी टीका सुवेंदू अधिकारी यांनी केली.