हिंगोली : हिंगोली काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्षाच्या बैठकीतही चव्हाट्यावर आल्याचे पाहून ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी उद्विग्न होऊन बैठक सोडली. लोकसभेची हिंगोलीची जागा मित्रपक्षाला सोडावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून ही जागा पदरात पाडून घेण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे.
सहा महिन्यांपासून हिंगोली मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून साखर पेरणी सुरू आहे. त्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पूर्णा साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेला खास निमंत्रित करण्यात आले होते. राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला हिंगोली मतदारसंघ मिळावा, यासाठी विनंती केली होती. नंतर अशोक चव्हाण यांच्या जिल्हा दौऱ्यात काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली होती. अशोकरावांसमोरच काँग्रेसच्या एका गटाने फलक फाडून गटबाजीचे दर्शन घडवले. हिंगोलीत पक्ष निरीक्षक सत्संग मुंडे यांनी घेतलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत काँग्रेसचे शहराध्यक्ष पवन उपाध्याय आणि सातव गटाचे विलास गोरे यांच्यामध्ये व पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यातच छत्रपती संभाजीनगरमधील काँग्रेसच्या बैठकीत आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी पक्षाच्या प्रभारींच्या पत्रावर हरकत घेतली. मात्र, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रज्ञा सातव यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे विभागीय आढावा बैठकीत पुन्हा वाद झाला.
हेही वाचा : जरांगे-पाटील यांच्या दबावापुढे सरकार झुकणार का?
काँग्रेसमधील चिघळत असलेला हा वाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या पथ्यावर पडला. हिंगोली मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा डोळा होताच. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या एका शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेतली. हिंगोली लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडून घेता येईल, कामाला लागा असा संदेश पवार यांनी पूर्वी दिला होता. राष्ट्रीय युवक काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत राजीव सातव यांच्यासाठी ही जागा काँग्रेसला सोडण्यात आली होती. काँग्रेसने नांदेड, हिंगोलीसह परभणी लोकसभेचे उमेदवार शोधण्यासाठी अशोक चव्हाण यांची नेमणूक केली आहे. हिंगोली लोकसभेसाठी डॉक्टर अंकुश देवसरकर यांचे नाव पुढे आणले जात आहे. माजी आमदार भाऊपाटील गोरेगावकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई यांनी मतदारांशी संपर्कही सुरू केला होता. मात्र जिल्ह्यातील गटबाजीमुळे आता राष्ट्रवादीचे नेते पुन्हा सक्रिय झाले आहेत.
हेही वाचा : हरियाणा : लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कसली कंबर, महत्त्वाचे नेते राज्यभर दौरा करणार!
शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळख असलेले राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीला लागले आहेत. पक्षाने संधी दिल्यास महाविकास आघाडी तथा इंडियाकडून लढण्यास सज्ज असल्याचे दांडेगावकर यांनी माध्यमांना सांगितले आहे.