कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सिद्धरमैया यांनी आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी एक मोठा निर्णय घेतला आहे. ही निवडणूक माझी शेवटची निवडणूक असेल, असं ते म्हणाले. बिदरमध्ये एका सभेला संबोधित करताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. दरम्यान, त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहे.
हेही वाचा – कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपाची रणनीती ठरली, विजयासाठी राबवणार गुजरात, उत्तर प्रदेशचे खास मॉडेल!
नेमकं काय म्हणाले सिद्धरमैय्या?
“आगामी कर्नाटक विधानसभा निवडणूक ही माझी शेवटची निवडणूक असेल. मी यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही. मात्र, मी राजकारणात सक्रीय असेन”, अशी प्रतिक्रिया सिद्धरमैया यांनी दिली. त्यांच्या या विधानाकडे एक ‘इमोशनल कार्ड’ म्हणून बघितलं जात आहे. सिद्धरमैया हे पुन्हा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.
कर्नाटकमध्ये कधी आहे निवडणूक?
कर्नाटक विधानसभेची मुदत २४ मे २०२३ रोजी संपणार असून सर्व २२४ जागांसाठी मे २०२३ पूर्वी निवडणूक होणार आहे. २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत जनता दल ( सेक्यूलर) आणि काँग्रेसने राज्यात सरकार स्थापन केले होते. मात्र, काही आमदारांनी भाजपात प्रवेश केल्याने हे सरकार पडले आणि भाजपाने कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन केली. यावरून काँग्रेसने भाजपावर घोडेबाजार केल्याचा आरोप केला होता.