काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील काँग्रेसचे दिग्गज नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांचा हा भाजपाप्रवेश काँग्रेससाठी मोठा धक्का होता. या धक्क्यातून काँग्रेस सावरत नाही तोच आता या पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे आता मध्य प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचे पुत्र खासदार नकुल हे काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
माजी मुख्यमंत्री व नऊ वेळा खासदार राहिलेले कमलनाथ यांनी गांधी कुटुंबातील तीन पिढ्यांबरोबर काम केले आहे. ५० वर्षांपासून ते काँग्रेसमध्ये काम करीत आहेत. ७७ वर्षीय कमलनाथ हे गेल्या १० वर्षांत काँग्रेस सोडणारे दहावे माजी मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा, पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा, दिवंगत अजित जोगी, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे व ओडिशाचे माजी मुख्यमंत्री गिरीधर गमांग यांनी पक्षाला राम राम ठोकला होता. त्यापैकी गिरीधर गमांग यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
हेही वाचा – निवडणूक रोखे योजनेविरुद्ध दंड थोपटणारी काँग्रेसची ‘ती’ रणरागिणी कोण?; शेवटपर्यंत दिला न्यायालयीन लढा!
एकीकडे कमलनाथ हे भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे कमलनाथ हे शनिवारी दुपारी छिंदवाड्याहून दिल्लीला रवाना झाले. यावेळी माध्यमांनी त्यांना भाजपामध्ये प्रवेश करणार आहात का, असे विचारले असता, “तुम्ही सर्व जण उत्साहित का आहात? मी जर भाजपामध्ये जाणार असेन, तर सर्वांत आधी मी तुम्हाला सांगेन”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्याशिवाय कमलनाथ यांचे पुत्र खासदार नकुल यांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यांवरून काँग्रेस हा शब्द हटविल्याने या चर्चांना आणखीनच पेव फुटले. विशेष म्हणजे यादरम्यान मध्य प्रदेश भाजपाचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनीही ‘जय श्रीराम’ अशी कॅप्शन लिहून कमलनाथ आणि त्यांच्या मुलाचा फोटो शेअर केला.
या संदर्भात ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना, छिंदवाड्याचे आमदार व माजी राज्यमंत्री दीपक सक्सेना म्हणाले, ”कमलनाथ यांच्या भाजपामधील प्रवेशाबाबत चर्चा सुरू असल्याचे समजते. त्याचे कारण छिंदवाड्यावर होत असलेला अन्याय असू शकतो. गेल्या काही वर्षांत छिंदवाड्याच्या विकासासाठी निधी देण्यात आलेला नाही. त्याशिवाय गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे खापर त्यांच्यावर फोडण्यात आले. त्यामुळे अशी चर्चा सुरू असेल, तर येत्या काही दिवसांत या चर्चेचे परिणाम तुम्हाला दिसून येतील.”
कमलनाथ यांनी काही दिवसांपूर्वीच छिंदवाड्यातील वरिष्ठ नेत्यांबरोबर बंद दरवाजाआड चर्चा केली होती. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाली. छिंदवाडा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ ओकटे यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “या बैठकीत कमलनाथ यांनी लोकसभेच्या रणनीतींवर चर्चा केली. मात्र, त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याबाबत कोणतीही चर्चा केली नाही.”
कमलनाथ यांच्या भाजपाप्रवेशाच्या चर्चेवर भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यानेही प्रतिक्रिया दिली. कमलनाथ लवकरच भाजपामध्ये प्रवेश करतील. जेव्हापासून जितू पटवारी यांना मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बनविण्यात आले, तेव्हापासून आमची कमलनाथ यांच्याशी चर्चा सुरू आहे. आगामी निवडणुकीत छिंदवाड्याची जागा भाजपा जिंकेल, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे, असे भाजपाचे वरिष्ठ नेते म्हणाले.
मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जितू पटवारी यांनी, कमलनाथ यांच्या भाजपाप्रवेशाच्या चर्चेत काहीही तथ्य नसून ही अफवा असल्याचे म्हटले आहे. “इंदिरा गांधींचा तिसरा मुलगा काँग्रेस सोडेल, अशी कल्पनाही तुम्ही कशी करू शकता? स्वप्नातही असा विचार येऊ शकतो का?, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्याशिवाय काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने मात्र या चर्चेबाबत चिंता व्यक्त करीत कमलनाथ यांनी ही अफवा फेटाळून लावली नसल्याचे म्हटले.
दरम्यान, संजय गांधी यांचे जवळचे मित्र, अशी ओळख असलेल्या कमलनाथ यांनी १९७० च्या दशकात युवक काँग्रेसमधून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. मूळचे उत्तर प्रदेशाच्या कानपूर येथील रहिवासी असलेल्या कमलनाथ यांना १९८० मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशातील छिंदवाडा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. आणीबाणीनंतरच्या काळात झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसने छिंदवाडा आणि राजस्थानमधील नागौर या दोनच जागांवर विजय मिळवला होता. तेव्हापासून कमलनाथ यांनी छिंदवाड्यातून लोकसभेच्या नऊ निवडणुका जिंकल्या.
हेही वाचा – एकीकडे दिल्लीत बळीराजा आक्रमक, दुसरीकडे युतीच्या चर्चा; शेतकरी आंदोलनाचा परिणाम SAD-BJP युतीवर होणार?
कमलनाथ हे पी. व्ही. नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए-१ आणि यूपीए-२ या सरकारमध्येही मंत्री होते. अनेक दशकांपासून काँग्रेसमध्ये असूनही कमलनाथ यांनी मध्य प्रदेशच्या राजकारणात ढवळाढवळ केली नव्हती. ते नेहमीच राष्ट्रीय नेते म्हणून ओळखले जात असत. मात्र, २०१८ मध्ये ते मध्य प्रदेशच्या राजकारणात सक्रिय झाले. तसेच मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही झाले. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला आणि ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीही झाले.
एकीकडे इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये सुरू असलेले मतभेद आणि दुसरीकडे पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे पक्षातून बाहेर पडणे यातून पक्षाला सावरणे हे काँग्रेससाठी मोठे आव्हान बनले आहे. अशातच कमलनाथ यांचे पक्षातून बाहेर पडणे हा काँग्रेससाठी मोठा धक्का असेल.