मालेगाव : दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे कुटुंब आणि मालेगाव शहराचा जुना ऋणानुबंध आहे. भारत जोडो न्याय यात्रा मालेगावात आल्यानंतर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी या ऋणानुबंधांना पुन्हा एकदा उजाळा दिला. पहिल्यांदाच मालेगावात आलेल्या राहुल यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी उसळली होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि पुष्पवृष्टीने झालेल्या या स्वागतामुळे राहुल गांधी हे भारावून गेले. आणीबाणीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. देशात जनता पक्षाची राजवट आली होती. त्यानंतर विरोधी पक्षनेत्या असताना १९७८ मध्ये इंदिरा गांधी यांनी मालेगाव येथे भेट देत सभा घेतली होती. या सभेनंतर परत जाण्यासाठी ओझर विमानतळाकडे निघालेल्या इंदिरा गांधी यांचा ताफा वाटेत उमराणे येथे ज्येष्ठ काँग्रेस नेते दिवंगत ग्यानदेवदादा देवरे यांनी अडवून त्यांना सभा घेण्याची गळ घातली. ग्यानदेव दादांच्या भावनेचा आदर राखत इंदिरा गांधी यांनी ऐनवेळी उमराणे येथेही सभा घेतली. यावेळी ग्यानदेव दादांनी मराठमोळी साडी भेट देऊन त्यांचे स्वागत केले होते. या स्वागतामुळे इंदिरा गांधी भारावून गेल्या होत्या, अशी आठवण आजही वृध्दांकडून सांगितली जाते.
१९८३ मध्ये मालेगावात दंगल उसळली होती. त्यावेळी पंतप्रधान असणाऱ्या इंदिरा गांधी यांनी थेट मालेगाव गाठत जनतेला शांततेचे आवाहन केले होते. तसेच दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या भेटीत त्यांनी हिंदुत्ववादी नेते दिवंगत नानासाहेब पुणतांबेकर यांना शासकीय विश्रामगृहावर बोलावून त्यांच्याकडूनही काही सूचना जाणून घेतल्या होत्या. संवेदनशील मालेगावात अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाची निकड लक्षात घेऊन इंदिरा गांधी यांनी दौऱ्यात सामील असलेले तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना मालेगावात अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय सुरू करण्याची सूचना केली होती. त्यानंतर तालुक्याचे ठिकाण असलेल्या मालेगावला अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय अस्तित्वात आले.
हेही वाचा : बच्चू कडूंकडून महायुतीत मिठाचा खडा?
राजीव गांधी हे पंतप्रधान असताना १९८५ च्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी राजीव यांनीही मालेगावला सभा घेतली होती. मालेगावच्या इतिहासात २००१ साली सर्वात मोठी जातीय दंगल झाली होती. या दंगलीत होरपळून निघालेल्या दोन्ही समाजातील लोकांचे सांत्वन करण्यासाठी सोनिया गांधी मालेगावी आल्या होत्या. यावेळी गांधी यांनी शहरातल्या वेगवेगळ्या भागातील गल्ली बोळांमधील घरांना भेटी देऊन तेथील रहिवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा रक्षकांचे कडे तोडून गांधी या निडरपणे लोकांमध्ये मिसळत होत्या. २००६ मध्ये येथील बडा कब्रस्तानात बॉम्बस्फोट झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी सोनिया गांधी मालेगावात दाखल झाल्या होत्या. औषधोपचार सुविधांच्या मर्यादांमुळे बॉम्बस्फोटातील जखमींना नीट उपचार मिळू शकले नसल्याचे समजल्यानंतर सोनिया गांधी हळहळल्या. त्यांच्याबरोबर असलेले तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मालेगावला सर्वसुखसोयींयुक्त रुग्णालय निर्माण करण्याचे आदेश त्यांनी जागीच दिले होते. मुख्यमंत्री मुंबईला परतल्यावर मालेगावसाठी लगेच २०० खाटांच्या सामान्य रुग्णालयास मंजुरी मिळाली. २००९ मध्ये या रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा सोनिया गांधींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला होता.
हेही वाचा : अशोक चव्हाणांच्या पक्षांतरामुळे चिखलीकरांना निवडणूक सोपी ?
भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने मालेगावी आलेल्या राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी रखरखत्या उन्हात लोकांनी मोठी गर्दी केली होती. राहुल गांधी यांनीही जोशपूर्ण भाषण करत लोकांच्या टाळ्या मिळवल्या. चौक सभेच्या ठिकाणी भाषण देत असताना राहुल गांधी यांनी एका नऊ वर्षाच्या बालकास आपल्या शेजारी बसवले. त्यानंतर काही वेळाने कराटे प्रशिक्षण घेणाऱ्या काही मुली सभास्थळी उपस्थित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तिघा मुलींनाही त्यांनी आपल्या शेजारी बसवले. भाषणाच्या अखेरीस या लहान बालकाच्या गळ्यात हात टाकत गरीब महिलांना वार्षिक एक लाख रुपये मदत आणि गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याविषयी काँग्रेसने दिलेले आश्वासन या बालकाच्या तोंडून त्यांनी वदवून घेतले. त्यानंतर कराटे प्रशिक्षणार्थी मुलींकडून काही प्रात्यक्षिकेही गांधी यांनी करुन घेतली.