काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली ‘भारत जोडो’ यात्रा हरियाणात पोहचली आहे. हरियाणातील कुरुक्षेत्र येथे राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘भारत जोडो’ यात्रेमुळे खूप काही शिकण्यास मिळालं. देशातील प्रश्न जाणून घेतले. तसेच, यात्रा जशी पुढं जात आहे, तेवढं लोकांचं समर्थन वाढत आहे, असं राहुल गांधींनी सांगितलं.
यात्रेमुळे तुमच्या प्रतिमेत काय बदल झाला? असा सवाल प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारल्यावर राहुल गांधी म्हणाले, “आपण ज्या व्यक्तीला पाहत आहात, तो राहुल गांधी नाही आहे. तुम्ही त्याला पाहू शकता, पण समजू शकत नाही. हिंदू धर्मग्रंथांना वाचा, शिवजी बद्दल वाचा तेव्हा तुम्हाला समजू शकेल. राहुल गांधी तुमच्या आणि भाजपाच्या डोक्यात आहे. पण, मी राहुल गांधीला मारुन टाकलं आहे. मला माझ्या प्रतिमेशी घेणं-देणं नाही आहे. प्रतिमेबद्दल मला कोणताही रस नाही. तुम्ही मला चांगलं किंवा वाईट बोलू शकता.”
हेही वाचा : “बिहार सरकारमध्ये सहभागी व्हायचं असतं तर एक फोन केला असता आणि….” प्रशांत किशोर यांनी काय म्हटलंय?
“निवडणुकीवर यात्रेचा काय फरक…”
“देशातील जनतेचा आवाज दाबणे, भिती आणि तोडफोडच्या राजकारणाविरोधात ही यात्रा आहे. ‘भारत जोडो’ यात्रा आमच्यासाठी तपस्या आहे. निवडणुकीवर यात्रेचा काय फरक पडेल माहिती नाही. यात्रा आर्थिक असमानता, बेरोजगारी, महागाई यांच्यासारख्या मुद्द्यांचा आवाज उठवण्यासाठी आहे, ज्यामध्ये आम्हाला यश मिळालं आहे,” असं राहुल गांधींनी म्हटलं.
हेही वाचा : “आधुनिक काळातले कौरव हाफ पँट घालतात आणि शाखेत जातात” राहुल गांधींचा संघावर निशाणा
“ही लढाई पूजा आणि तपस्यामध्ये आहे”
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ( आरएसएस ) आणि मोदींना वाटतं सर्वांनी त्यांची पूजा करावी. पण, याला तपस्या हे उत्तर आहे. काँग्रेससह लाखो लोक तपस्या करत आहे. जो आमची पूजा करेल, त्याला सन्मान करण्यात येईल, असं आरएसएस सांगतं. पण, देशात तपस्या करणाऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे. ही लढाई पूजा आणि तपस्येमध्ये आहे. काँग्रेसमध्ये तपस्येची उणीव होती, ती यात्रेमुळे पूर्ण झाली,” असेही राहुल गांधींनी सांगितलं.