गेल्या अनेक महिन्यांपासून छत्तीसगडमध्ये अनेक रेल्व अचानकपणे रद्द करण्यात येतात. सध्या छत्तीसगडमधील रेल्वेचे वेळापत्रक पुरते बिघडले आहे. त्याचा त्रास छत्तीसगडमधील नागरिकांना वर्षभरापासून होत आहे. हाच मुद्दा घेऊन येथे अनेक आंदोलनं झाली आहेत. याबाबत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दोन वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. दरम्यान, छत्तीसगडमधील रेल्वेसेवा पुरती विस्कळीत झालेली असताना काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी रेल्वेने प्रवास केला आहे. त्यांच्या या रेल्वेप्रवासामुळे छत्तीसगडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहुल गांधींनी केला रेल्वेने प्रवास

राहुल गांधी २७ सप्टेंबर रोजी छत्तीसगडच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी बिलासपूर ते रायपूर असा रेल्वेने प्रवास केला. यावेळी त्यांनी रेल्वेतील प्रवाशांसी संवाद साधला. राहुल गांधींच्या प्रवासाबद्दल छत्तीसगड प्रदेश काँग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख आनंद शुक्ला यांनी प्रतिक्रिया दिली. “रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना काय अडचणींचा सामना करावा लागतोय, हे राहुल गांधी यांनी जाणून घेतले. सध्या छत्तीसगडमध्ये अनेक रेल्वे रद्द केल्या जात आहेत. किंवा काही रेल्वे उशिराने धावत आहेत. सध्या केंद्र सकारकडून  रेल्वेचे खासगीकरण केले जात आहे,” असे शुक्ला यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांची मोदींना दोन पत्रे

रेल्वेबाबतच्या या अडचणींबद्दल मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याआधीच कळवलेले आहे. त्यांनी मोदी यांना गेल्या वर्षाच्या डिसेंबर महिन्यात तसेच या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात असे एकूण दोन पत्रं लिहिली आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसने हाच मुद्दा घेऊन १३ सप्टेंबर रोजी रेल रोको आंदोलन केले होते. रेल्वे रद्द होण्याचा हा प्रश्न येणाऱ्या निवडणुकीत प्रमुख मुद्द्यांपैकी एक होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच महिन्यात छत्तीसगडच्या दौऱ्यावर होते. यावेळीदेखील काँग्रेसने रेल्वेच्या मुद्द्यावर आंदोलन केले होते.

रेल्वे प्रवासादरम्यान सध्या लोकांची होत असलेली गैरसोय ही तात्पुरती आहे. सध्या अनेक ठिकाणी नवे रेल्वेजाळे निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे ही समस्या उद्भवली आहे, असा दावा केला जात आहे. मात्र नवे रेल्वेरुळ टाकण्याचे काम कधीपर्यंत संपणार, याबात रेल्वे अधिकारी किंवा सरकारकडून ठोस माहिती दिली जात नाहीये.

 २०२२ साली एकूण २४७४ रेल्वे रद्द

कुणाल शुक्ला यांनी आतापर्यंत किती रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत ? हे जाणून घेण्यासाठी माहितीच्या अधिकाराअंतर्गत अर्ज केला होता. या माहितीच्या अधिकाराअंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार २०२२ साली एकूण २४७४ रेल्वे रद्द करण्यात आल्या होत्या. तर चालू वर्षात एप्रिल महिन्यापर्यंत साधारण २०८ रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये हावडा मेल आणि दुरांतो एक्स्प्रेस सारख्या लोकप्रिय गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांना प्रवाशांची कायम गर्दी असते. 

 रेल्वेस्थानकांवर सुधारणांची वेगवेगळी कामे केली जात आहेत- अरुण साओ

राहुल गांधी यांचा रेल्वेप्रवास आणि सध्या विस्कळीत झालेले रेल्वेचे वेळापत्रक यावर भाजपाच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. छत्तीसगड भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा लोकसभेचे खासदार अरूण साओ यांनी राहुल गांधींच्या रेल्वेप्रवासावर प्रतिक्रिया दिली आहे. सध्या छत्तीसगडमधील रेल्वेस्थानकांवर सुधारणांची वेगवेगळी कामे केली जात आहेत. तसेच अनेक नवी कामे सुरू आहेत. लोकांना या कामांचा लवकरच लाभ मिळणार आहे. मी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्या सातत्याने संपर्कात आहे, असे साओ म्हणाले.

५० वर्षांत काँग्रेसने काहीच केले नाही- ओ. पी. चौधरी

तर माजी आयएएस अधिकारी तथा भाजपाचे नेते ओ. पी. चौधरी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. “रेल्वेचा विकास करण्याची गरज होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून साधारण ५० वर्षे काँग्रेसने काहीही केलेले नाही. मात्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ सालाच्या तुलनेत रेल्वेच्या विकासासाठीचा खर्च ९ टक्क्यांनी वाढला आहे. सध्या ऐतिहासिक काम सुरू आहे,” असे चौधरी म्हणाले. सध्या गैरसोईचा सामना करावा लागतोय, कारण भविष्यात प्रवास खूप सुकर होणार आहे, असेही चौधरी म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसचे नेते मलकितसिंह गायडू यांनीही कोलमडलेल्या रेल्वेसेवेवर प्रतिक्रिया दिली. “ही अडचण दूर करणे केंद्र सरकारवर आहे. सध्या अनेक सण येत आहेत. काही सण येऊन गेले. लोकांना रेल्वेसेवेचा फायदा घेता येत नाहीये,” असे गायडू म्हणाले. त्यांनी याआधी रेल्वे रद्द होण्याच्या मुद्द्यावरून रेल रोको आंदोलन केलेले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader rahul gandhi travelled by train in chhattisgarh congress and bjp criticizes each other prd
Show comments