संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लातूरचे शिवराज पाटील यांचे अस्तित्व अनेक दिवसांनी राजकीय वर्तुळात जाणवले. जिहादवरून केलेल्या वादग्रस्त विधानानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने शिवराज पाटील उलटसुलट युक्तिवाद करत असताना काँग्रेसने मात्र त्यांच्या विधानापासून फारकत घेत त्यांना घरचा आहेर दिला. अखेर पाटील यांनाही सारवासारव करावी लागली.

माजी केंद्रीय गृहमंत्री, पंजाबचे माजी राज्यपाल अशी विविध पदे भूषविलेले शिवराज पाटील काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या निकटवर्तीयांमध्ये ओळखले जात असत. केंद्रात काँग्रेस पक्षाला सत्ता मिळताच लोकसभेत पराभूत होऊनही गृहमंत्रीपदाची महत्त्वाची जबाबदारी सोनिया गांधी यांनी शिवराज पाटील यांच्याकडे सोपविली होती. पण गृहमंत्री म्हणून फारसा प्रभाव पाडू न शकल्याने पाटील यांना पदावरून दूर करण्यात आले. गृहमंत्रिपद भूषविल्यावर पंजाबचे राज्यपालपद त्यांनी स्वीकारले. गेले १० ते १२ वर्षे तसे राजकीयदृष्ट्या विजनवासात गेलेल्या शिवराज पाटील यांचे अस्तित्वच कुठे जाणवत नव्हते. पण नवी दिल्लीतील एका कायर्क्रमात पाटील यांनी केलेले विधान काँग्रेस पक्षाच्या अंगलट आले. शेवटी काँग्रेसने पाटील यांच्या विधानापासून फारकत तर घेतलीच पण पाटील यांचे विचार स्वीकारता येणार नाहीत, असे स्पष्ट केले.

हेही वाचा : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत भाजपच्या दीपोत्सवात चारचाकी, दुचाकी, पैठण्यांची ‘भेट’

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मोहसिना किडवाई यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभात बोलताना शिवराज पाटील यांनी जिहादची संकल्पना ही केवळ इस्लाम धर्मात नसून, भगवत् गीतेतही असल्याचे विधान केले होते. पाटील यांच्या निधनाने वाद निर्माण झाला. भाजपने तर लगेचच काँग्रेस पक्षावर अल्पसंख्याकांची भलामण करण्याचा आरोप केला. यातून काँग्रेसची चांगलीच पंचाईत झाली. म्हणूनच पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी शिवराज पाटील यांच्या वक्तव्याशी काँग्रेस पक्ष सहमत नसल्याचे स्पष्ट केले. काँग्रेस पक्षात वर्षानुवर्षे दरबारी राजकारण करणाऱ्या शिवराज पाटील यांच्यावर पक्षाची कधीच खप्पामर्जी झाली नव्हती. पण उतार वयात किंवा राजकीयदृष्ट्या विजनवासात गेल्यावर शिवराज पाटील यांना काँग्रेसने अभय न देता उलट दणकाच दिला.

हेही वाचा : विश्लेषण : टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान धोकादायक संघ… पण जगज्जेतेपदाची संधी किती?

फारसा जनाधार नसतानाही काँग्रेस पक्षात शिवराज पाटील यांना विविध महत्त्वाची पदे मिळत गेली. विधानसभा अध्यक्षपदापासून केंद्रात विविध मंत्रिपदे त्यांना भूषविण्याची संधी मिळाली. सोनिया गांधी लोकसभेत विरोधी पक्षनेत्या असताना शिवराज पाटील हेच सोनियांची भाषणे तयार करून देत किंवा कोणत्या प्रश्नावर काय भूमिका घ्यायची याचा निर्णय घेत असत. तेव्हा सोनिया गांधी यांच्या एकदमच विश्वासातील होते. २००४ मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यावरही सोनिया गांधी यांनी शिवराज पाटील यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करून त्यांच्याकडे गृह हे संवेदनशील खाते सोपविले होते. २६ – ११चा मुंबईवरील हल्ला, बाटला हाऊस चकमक अशा विविध प्रकरणांमध्ये पाटील अपयशी ठरले होते. निष्क्रियतेचा ठपका ठेवून पाटील यांचा राजीनामा घेण्यात आला होता. तेव्हापासून राजकीय पटापासून पाटील दुरावले गेले. गेल्या काही वर्षांत शिवराज पाटील यांचे अस्तित्वही जाणवत नव्हते. पण एका विधानामुळे त्यांचे नाव पुन्हा चर्चेत आले असले तरी पक्षानेच त्यांच्या विधानावर नापसंती व्यक्त केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader sonia gandhi loyalist shivraj patil statement on jihad navi delhi print politics news tmb 01
Show comments