नागपूर : भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असताना काँग्रेसचे विदर्भातील नेते मात्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध मोर्चेबांधणीत व्यस्त आहे. माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार आणि शिवाजीराव मोघे यांनी पटोले यांच्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी नुकतीच दिल्लीवारी केली आहे.
पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकाल्यानंतर संघटनेत फेरबदल केले. तेव्हापासून पक्षातील जुने, अनुभवी नेते नाराज होते. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनंतर तेथील जिल्हाध्यक्षांची तडकाफडकी उचलबांगडी करणे पटोले यांच्याविरोधात नाराज नेत्यांना एकत्र येण्याचे निमित्त ठरले.
हेही वाचा – अमरावती : स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना, महिमापूरची ऐतिहासिक पायविहीर दुर्लक्षितच!
बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपशी हातमिळवणी केल्याप्रकरणी काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवतळे यांना प्रदेश काँग्रेसने पदमुक्त केले. देवतळे हे विजय वडेट्टीवार यांचे निकटवर्तीय होते. त्यामुळे वडेट्टीवार नाराज झाले. त्यांनी जिल्हाध्यक्षांना हटवण्याचे अधिकार पटोले यांना नाहीत, असा दावा केला. दुसरीकडे पटोले यांच्याशी माजी मंत्री सुनील केदार यांचे शीतयुद्ध सुरू आहे. केदार यांनी जिल्हा परिषद निवडणूक, विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत ऐनवेळी उमेदवार बदलणे आणि शिक्षक मदारसंघाचा उमेदवार ठरवणे यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. यामध्ये पटोले यांना नमते घ्यावे लागले होते. एवढेच नव्हेतर महाविकास आघाडीच्या नागपुरातील वज्रमूठ सभेचे मुख्य समन्वयक केदार होते. त्यामुळे या सभेच्या तयारीत पटोले यांनी फार सक्रियता दाखवली नव्हती. केदार, वडेट्टीवार व मोघे या विदर्भातील काँग्रेसच्या तीनही नेत्यांचे पटोले यांच्याशी राजकीय सूर जुळले नाही. या नेत्यांनी नुकताच आपल्या समर्थकांसह दिल्लीचा दौरा केला. वरिष्ठ नेत्यांना भेटून पटोले यांच्या कार्यशैलीवर नापसंती व्यक्त केली.
वडेट्टीवार यांनी मात्र पटोले यांच्या विरुद्ध तक्रार केल्याचा इन्कार केला. कर्नाटकमध्ये भाजपचा दारुण पराभव करून काँग्रेसने सत्ता मिळवली. त्याबद्दल पक्षातील वरिष्ठ नेत्यांना शुभेच्छा देण्यासाठी दिल्लीत गेल्याचे वडेट्टीवार यांनी माध्यमांना सांगितले. पटोले यांनीही प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या वृत्ताचा इन्कार केला. वरील नेत्यांची दिल्ली भेट आणि प्रदेशाध्यक्ष बदलवण्याचा काहीही संबंध नाही, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपर्यंत आपणच प्रदेशाध्यक्षपदी राहणार, असा दावाही त्यांनी केला आहे.