Congress Stand on Pahalgam Terrror Attack : “दहशतवाद्यांना धर्म विचारायला वेळ आहे का?” असं महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटल्यानंतर महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला. तसंच, “देशात युद्धाची गरज नसून सुरक्षा व्यवस्था कडक करण्याची गरज आहे”, असं विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केल्याने काँग्रेसची पहलगामसंदर्भात नेमकी भूमिका काय? अशी उलटसुलट चर्चा सुरू झाली. एकीकडे सर्वपक्षीय बैठकीत केंद्र सरकारच्या उपाययोजनांना काँग्रेसने पाठिंबा दर्शवलेला असताना काँग्रेसच्या इतर नेत्यांनी मात्र केंद्र सरकारवर पहलगामवरून टीका केली. त्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नाराज होते, असं म्हटलं जातंय. त्यामुळे काँग्रेसच्या अधिकृत प्रवक्त्याने दिलेली विधानेच काँग्रेसची भूमिका असेल. इतर नेत्यांची विधानं ही त्यांची वैयक्तिक असतील, असं स्पष्टीकरण काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते जयराम रमेश यांना स्पष्ट करावं लागलं.
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी गोळीबार केला. येथे आलेल्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून दहशतवाद्यांनी त्यांना लक्ष्य केलं. या हल्ल्यात जवळपास २६ जणांचा मृत्यू झाला. देशभरातील विविध राज्यातून आलेल्या पर्यटकांचा यात मृत्यू झाला. या घटनेनंतर जगभर खळबळ माजली. भारताने या हल्ल्याला पाकिस्तानला जबाबदार धरलं आहे. पाकिस्तनाने या हल्ल्याची जबाबदारी घेणं टाळलं असलं तरीही भारताने पाकिस्तानची चहुबाजूने कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
सर्वपक्षीय बैठकीत केंद्राला पाठिंबा, पण नेत्यांचा विरोध
गेल्या अनेक वर्षांपासून जम्मू काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होत असून त्यांचा समूळ नायनाट करण्याकरता ठोस उपाययोजना आखणं गरजेचं आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकारने पहलगाम संदर्भात चर्चा करण्याकरता सर्वपक्षीय बैठकही आयोजित केली होती. या बैठकीला काँग्रेसचे नेते उपस्थित होते. या हल्ल्याविरोधात कारवाई करण्याकरता केंद्र सरकार जे उपाययोजना आखतील, त्याकरता काँग्रेसचा पाठिंबा असेल, अशी काँग्रेसने भूमिका जाहीर केली. मात्र, काँग्रेसच्या काही नेत्यांनी केलेल्या सार्वजनिक विधानांमुळे काँग्रेसची नेमकी भूमिका काय? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी X वरील एका पोस्टमध्ये स्पष्ट केले की नेत्यांनी केलेली वैयक्तिक विधाने पक्षाची भूमिका असणार नाही. त्यांनी यावर भर दिला की केवळ खरगे, राहुल गांधी आणि अधिकृत एआयसीसी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेले विचारच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची भूमिका दर्शवतात.
“काही काँग्रेस नेते माध्यमांशी बोलत आहेत. त्यांनी केलेली विधाने ही त्यांची स्वतःची असून ती पक्षाची अधिकृत भूमिका नाही. या अत्यंत संवेदनशील काळात काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव, मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी व्यक्त केलेले विचार आणि अधिकृत काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे विचार हे काँग्रेसच्या भूमिकेचे प्रतिनिधित्व करतात यात शंका नाही”, असे रमेश म्हणाले.
पक्षविरोधी भूमिका मांडणाऱ्यांना पक्षनेतृत्त्वाने फटकारले
परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत काँग्रेस या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी अधिकृत निवेदन जारी करण्याची शक्यता आहे. पक्षाच्या दृष्टिकोनाशी विसंगत भाष्य करणाऱ्या नेत्यांना अंतर्गत फटकारण्यात आले आहे, असे सूत्रांनी सांगितल्याचं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे. पक्ष नेतृत्वाने हे स्पष्ट केले आहे की पहलगाम मुद्द्यावरील भविष्यातील कोणत्याही संवादात काँग्रेसच्या जाहीर भूमिकेचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.
पहलगाम हल्ल्याविरोधात काँग्रेसचे नेते काय म्हणाले?
“युद्धाची गरज नाही, कडक उपाययोजना केल्या पाहिजेत. सुरक्षा व्यवस्था कडक करण्याची गरज आहे. आम्ही युद्धाच्या बाजूने नाही. शांतता असली पाहिजे, लोकांना सुरक्षा मिळाली पाहिजे आणि केंद्र सरकारने सुरक्षा उपाययोजना केल्या पाहिजेत”, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धराम्या म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटल्यानंतर त्यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली. त्यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं.
“पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. ते (सरकार) म्हणत आहेत की दहशतवाद्यांनी लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर मारले. दहशतवाद्यांना हे सर्व करण्यासाठी वेळ आहे का?… काही लोक म्हणतात की हे घडलेच नाही. दहशतवाद्यांना कोणताही जात किंवा धर्म नसतो. जबाबदार असलेल्यांना ओळखा आणि योग्य कारवाई करा. ही देशाची भावना आहे”, असं महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.