नवी दिल्ली : हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या दोन्ही विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच पराभूत झाल्याचे निकालावरून स्पष्ट होते. हरियाणामध्ये काँग्रेसला केवळ ३७ जागांपर्यंत मजल मारता आली तर, जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसला फक्त ६ जागा मिळाल्या. त्यातही जम्मू विभागात १ जागा जिंकता आली.
हरियाणामध्ये काँग्रेसची लाट असून बहुमताचा आकडा सहजपणे पार केला जाईल असे काँग्रेसचे नेते सांगत होते. मतदानोत्तर चाचण्यांमधील अनुमानामुळे काँग्रेसच जिंकणार असे मानले जात होते. त्यामुळे मंगळवारी मतमोजणी सुरू होताच काँग्रेसच्या दिल्लीतील मुख्यालयात मिठाई वाटून आनंद साजरा केला गेला. पण, निकाल स्पष्ट झाल्यानंतर मुख्यालयात नीरव शांतता पसरली होती.
हेही वाचा : जाटेतर, दलित, अपक्षांची साथ; हरियाणामध्ये भाजपच्या विजयात इतर मागासवर्गीयांचा महत्त्वाचा वाटा
काँग्रेसच्या हरियाणामधील पराभवाला अतिआत्मविश्वास कारणीभूत असल्याचे आता सांगितले जात आहे. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने निवडणुकीची सर्व सूत्रे भूपेंद्र हुड्डा यांच्याकडे दिली होती. प्रभावशाली जाट समाज भाजपविरोधात एकवटल्यामुळे हुड्डांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जिंकणार असे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, शैलजा, सुरजेवाला व हुड्डा यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले. जागावाटपामध्ये हुड्डांचा प्रभाव राहिल्यामुळे जाटविरोधात जाटेतरांनी भाजपला मते दिल्याचेही मानले जात आहे.
हरियाणामध्ये आमची सत्ता येणार असून फक्त मुख्यमंत्री कोण होणार एवढाच प्रश्न आहे, असे काँग्रेसचे नेत्यांचे म्हणणे होते. निवडणूक जिंकण्याआधीच कुमारी शैलजांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता. नाराज शैलजांनी प्रचार करण्यापेक्षा घरी बसणे पसंत केले होते.
हेही वाचा : काश्मीरमधील मतविभागणीचे भाजपचे डावपेच अपयशी
जम्मू-काश्मीरमध्येही काँग्रेसची संघटना कमकुवत असल्याने पक्षाला फारसे यश मिळवता आले नाही. काश्मीरमध्ये राष्ट्रीय पक्षांपेक्षा प्रादेशिक पक्षांना मतदारांची पसंती मिळते. काँग्रेसने खोऱ्यात ५ जागा मिळवल्या असल्या तरी जम्मू विभागात काँग्रेसने भाजपविरोधात लढण्याचे कसोशीने प्रयत्न केले नसल्याचे स्पष्ट होते. ‘काश्मीर खोऱ्यात आम्ही आहोत, तुम्ही जम्मू विभागाकडे लक्ष द्या,’ असे ओमर अब्दुल्ला यांना राहुल गांधींना सांगावे लागले होते. तरीही राहुल गांधींच्या वा मल्लिकार्जून खरगेंच्या पुरेशा सभा झाल्या नाहीत. रमण भल्ला यांच्यासारखा प्रभावी नेतादेखील दक्षिण जम्मू मतदारसंघातून जिंकू शकला नाही. जम्मू विभागातील पुंछ, राजौरी, रियासी या तुलनेत मुस्लिमांची संख्या जास्त असलेल्या मतदारसंघांमध्ये नॅशनल कॉन्फरन्सने बाजी मारली. हिंदूबहुल जम्मू, उधमपूर, कथुआ, सम्बा या जिल्ह्यांमधील एकही जागा काँग्रेसला जिंकता आली नाही. जम्मू जिल्ह्यातील ११ पैकी १० जागा भाजपने जिंकल्या आहेत. जम्मू विभागात संघटनेतील शैथिल्य आणि केंद्रीय नेत्यांचे दुर्लक्ष यामुळे काँग्रेसला मोठा फटका सहन करावा लागल्याचे मानले जात आहे.