Congress : लोकसभा निवडणूक २०२४ नंतर सलग तिसर्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे. याच्या काही दिवसांनंतर शुक्रवारी काँग्रेस पक्षात काही मोठे संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या बदलांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांचा थेट प्रभाव पाहायला मिळाला.
काँग्रेसने दोन राज्यांमध्ये सरचिटणीस आणि नऊ राज्यांसाठी प्रभारी नियुक्त केले आहेत, तर या पदांवर असलेल्या सहा नेत्यांना काढून टाकले आहे.
काँग्रेसने छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) सचिवालयात आणले आहे, तसेच त्यांना पंजाबचे सरचिटणीस म्हणून देखील नियुक्त करण्यात आले आहे. राज्यसभा खासदार सय्यद नासीर हुसेन यांना जम्मू काश्मीर आणि लडाखचे प्रभारी सरचिटणीस बनवण्यात आले आहे.
बघेल यांना देवेंदर यादव यांच्या जागी संधी देण्यात आली आहे. यापूर्वी यादव हे दिल्ली काँग्रेसचे प्रमुख असताना देखील त्यांना पंजाबचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तर हुसेन यांना गुजरातचे नेते भरतसिंह सोलंकी यांच्याएवजी जम्मू काश्मीरच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
नवीन नियुक्ती झालेले नेके एकतर विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्या जवळचे आहेत किंवा एआयसीसी सचिव प्रियांका गाधी यांच्या जवळचे आहेत. उदाहरण पाहायचे झाल्यास बघेल यांचे प्रियांका गांधी यांच्याशी चांगले संबंध आहेत. या नियुक्त्यांमध्ये एक अपवाद हुसेन यांचा आहे, जे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांचे जवळचे मानले जातात. कर्नाटकचे राज्यसभा खासदार असल्याने ते खरगे यांच्या कार्यालयाचे प्रभारी होते.
राज्याच्या प्रभारीपदी नियुक्ती झालेल्यांमध्ये राज्यसभा खासदार रजनी पाटील (हिमाचल प्रदेश आणि चंदीगड), बी. के हरिप्रसाद (हरियाणा). हरिश चौधरी (मध्य प्रदेश), गिरिश चोडणकर (तामिळनाडू आणि पुद्दुचेरी), अजय कुमार लल्लू (ओडिशा), के राजू (झारखंड), मिनाक्षी नटराजन (तेलंगणा), लोकसभा खासदार सप्तगिरी शंकर उल्का (मणिपूर, त्रिपुरा, सिक्कीम आणि नागालँड) आणि कृष्णा अल्लवरू (बिहार) यांचा समावेश आहे.
यापैकी बहुतेक नेत्यांनी यापूर्वी संघटनात्मक जबाबदार्या सांभाळल्या आहेत. जसे की हरिप्रसाद हे अनेक राज्यांचे प्रभारी सरचिटणीस राहिले आहेत. आता त्यांना प्रभारी बनवण्यात आले आहे. फेरबदलापूर्वी चोडणकर हे मणिपूर, त्रिपुरा, सिक्कीम आणि नागालँडचे प्रभारी होते. लल्लू, राजू आणि उल्का यांना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. हे सर्व नेते राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जातात.
लल्लू हे यापूर्वी उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रमुख होते, राजू हे माजी सनदी अधिकारी आहेत आणि त्यांनी काँग्रेसच्या एससी, एसटी, ओबीसी तसेच अल्पसंख्यांक विभागात राहुल गांधीबरोबर मिळून जवळून काम केले आहे. तर अल्लवारू हे सध्या युवक काँग्रेसचे प्रभारी आहेत आणि त्यांच्याकड विधासभा निवडणुकीच्या तोंडावर बिहारची जबाबदारी देण्यात आली आहे. नटराजन यांनी यापूर्वी काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायती राज संघटन याची जबाबदारी सांभाळली आहे.
पदावरू हटवण्यात आलेल्या सहा नेत्यांमध्ये दीपक बाबरीया यांचा समावेश आहे, त्यांच्याकडे हरियाणामधील काँग्रेसचे सर्वोच्च पद होते. पण पक्षाचा विधासभेत पराभव झाल्याने त्यांचे पद धोक्यात आले आहे.
सोलंकी (जम्मू काश्मीर) आणि यादव (पंजाब) यांच्याशिवाय इतर सरचिटणीस पदावरून हटवलेल्यांमध्ये मोहन प्रकाश (बिहार), राजीव शुक्ला (हिमाचल प्रदेश, चंदीगड) आणि अजॉय कुमार (ओडिशा, तामिळनाडू आणि पद्दुचेरी) यांचा समावेश आहे.
२६ डिसेंबर रोजी कर्नाटकातील बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर शुक्रवारी या पक्षांतर्गत फेरबदलाची घोषणा करण्यात आली. हा एका मोठ्या पुनर्रचनेचा भाग असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसने संघटनेत वरपासून खालपर्यंत फेरबदल करण्याची घोषणा केली होती.
याला कारण म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसला महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्लीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकींमध्ये पराभव मिळाला आहे.