पीटीआय, चंडीगड
हरियाणा विधानसभा निवडणुकीनिमित्ताने काँग्रेसने शनिवारी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. शेतकऱ्याच्या कल्याणसाठी आयोगाची स्थापना, शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी दोन कोटी रुपये, रोजगार निर्मितीसाठी श्रमिक घटकांना प्रोत्साहन आणि हरियाणा अल्पसंख्याक आयोगाची पुनर्रचना आदी आश्वासनांचा समावेश या जाहीरनाम्यात आहे.
हरियाणा काँग्रेसचे प्रमुख उदय भान, विरोधी पक्षनेते भूपिंदरसिंह हुड्डा, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आदी नेते यावेळी उपस्थित होते. समाजातील सर्व घटकांशी चर्चा करून जाहीरनामा तयार करण्यात आला आहे, असे गेहलोत यांनी यावेळी सांगितले.
जाहीरनाम्यात काय?
किमान आधारभूत किंमत, जात सर्वेक्षण, ५०० रुपयांना गॅस सिलिंडर, १८ ते ६० वयोगटातील प्रत्येक महिलेला मासिक २,००० रुपये, वृद्धांना ६,००० रुपये मासिक निवृत्तीवेतन, अपंग व विधवांसाठी योजना, दोन लाख कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या आणि ३०० युनिट मोफत वीज आणि २५ लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्याकीय उपचार.
‘हरियाणातील दशकभरातील वेदना काँग्रेस संपवेल’
हरियाणात काँग्रेसचे येणारे सरकार राज्यातील दशकभरातील वेदना संपवेल, असा आशावाद लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्यक्त केला. हरियाणा काँग्रेसने जाहीरनामा जाहीर केल्यानंतर राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर त्याबाबत माहिती दिली. हरियाणातील जनतेच्या विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे. पक्षाने त्यांच्या आशा व आकांशा पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. एका दशकात भाजपने हरियाणाची समृद्धी, स्वप्ने आणि जनसत्ता हिसकावून घेतली आहे. ती परत मिळवून देण्याचा प्रयत्न काँग्रेस करणार असल्याचे गांधी यांनी सांगितले.