इंफाळमध्ये कट्टरपंथीय गट अरामबाई तेंगगोल यांनी नुकत्याच बोलावलेल्या मैतेई आमदारांच्या बैठकीत काँग्रेसचे आमदार आणि पक्षप्रमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याविरोधात काँग्रेस केंद्र सरकारकडे आवाज उठवणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून, या घटनेची आणि राज्यात कायदा व सुव्यवस्थेची बिघडलेली स्थिती दर्शविणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
२४ जानेवारी रोजी अरामबाई तेंगगोल यांनी बोलावलेल्या बैठकीचा भाग असलेल्या एका आमदाराने सांगितले की, दोन भाजप आमदार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष के. मेघचंद्र अशा तीन आमदारांना या बैठकीदरम्यान गटाच्या सदस्यांनी मारहाण केली.
काँग्रेसच्या नेत्यांची प्रतिक्रिया
गुरुवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी या हल्ल्याबद्दल ट्वीट केले. “काल इंफाळमधील कंगला येथे राज्य आणि केंद्रीय दलांचे सुरक्षा रक्षक असूनही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – मणिपूरचे अध्यक्ष के. मेघचंद्र यांच्यावर सर्वपक्षीय आमदार / खासदार / मंत्र्यांच्या बैठकीत झालेल्या क्रूर शारीरिक हल्ल्याचा तीव्र निषेध करते. माणिपूरमधील घटनांवर पंतप्रधानांचे मौन कायम आहे ही शोकांतिका आहे,” असे त्यांनी लिहिले होते.
बैठकीला उपस्थित असलेल्या आमदारांनी दिलेल्या माहितीनुसार, पवनम ब्रोजेन सिंग आणि खवैरकपम रघुमणी सिंग या भाजप आमदारांवर हल्ला करण्यात आला.
मेघचंद्र यांना राज्यातील परिस्थितीसाठी भाजपशासित राज्य सरकारला जबाबदार धरल्याबद्दल मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे.
ज्या बैठकीत हा हल्ला झाला, ती बैठक सर्व मैतेई आमदार आणि खासदारांना अरामबाई तेंगगोल गटाने दिलेल्या ‘समन्स’चा परिणाम होता. इंफाळच्या ऐतिहासिक कंगला किल्ल्याच्या आत आणि दरवाजांवर सुरक्षा रक्षक तैनात होते. या बैठकीत केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंग आणि माजी काँग्रेस मुख्यमंत्री ओक्रोम इबोबी सिंग यांच्यासह समाजातील सर्व आमदार आणि खासदारांनी हजेरी लावली होती.
योगायोगाने केंद्रीय गृह मंत्रालयाचे एक विशेष पथकही त्यावेळी मणिपूरमध्ये चर्चेसाठी उपस्थित होते. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग बैठकीला उपस्थित नव्हते; मात्र बैठकीत जाहीर झालेल्या मागण्यांच्या कागदपत्रावर त्यांची स्वाक्षरी होती.
नरेंद्र मोदी सरकारवर आरोप
अलीकडेच मणिपूरमध्ये काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारवर राज्यातील स्थिती हाताळण्यास असमर्थ असल्याचे अनेक आरोप केले. विशेषत: राज्यात हिंसाचार सुरू झाल्यापासून म्हणजेच मे महिन्यापासून पंतप्रधान मणिपूरला भेट देऊ शकलेले नाहीत. या विषयावरून सातत्याने आरोप करण्यात आले.
मणिपूरमधील मैतेई-कुकी संघर्षाच्या या नऊ महिन्यांत प्रसिद्ध झालेल्या कट्टरपंथी मैतेई गट अरामबाई तेंगगोलवर हिंसाचाराच्या अनेक घटनांचा आरोप आहे.