छत्रपती संभाजीनगर : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या परळी विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्याविरोधात अखेर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली. परळीतील लढतीकडे ओबीसी विरुद्ध मराठा, अशा जातीय समीकरणातून पाहिले जाईल.
पंकजा मुंडे ग्रामविकासमंत्री असताना त्यांनी २०१७ मध्ये काँग्रेसच्या एका गटाकडून मिळवलेल्या पाठिंब्यावर जिल्हा परिषद ताब्यात घेतली होती. त्यामध्ये राजेसाहेब देशमुख हे शिक्षण व आरोग्य सभापती होते. राजेसाहेब देशमुख हे अंबाजोगाई तालुक्यातील माकेगाव येथील मूळ रहिवासी आहेत. ग्रामपंचायत सदस्य ते अंबाजोगाई पंचायत समितीचे उपसभापती, बाजार समितीचे संचालक, अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा गटाचे जिल्हा परिषद सदस्य, असा त्यांचा राजकीय प्रवास झालेला आहे.
मागील आठवड्यापर्यंत ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. रविवारी त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याची माहिती आहे. परळी विधानसभा मतदारसंघात अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर, घाटनांदूर, पाटोदा व पट्टी वडगाव हे जिल्हा परिषदेचे चार गट समाविष्ट आहेत. या अंतर्गत ६० गावे येतात.
परळी विधानसभा मतदारसंघात परळी व अंबाजोगाई तालुक्यातील मिळून एकूण २३० गावे असल्याची माहिती नुकतीच औरंगाबाद खंडपीठात दाखल एका याचिकेतून सादर करण्यात आली होती.
अंबाजोगाई तालुक्यातील ६० गावांपैकी बहुतांश गावे ही मराठा बहुल आहेत. राजेसाहेब देशमुख हे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी जोडलेले होते. वर्षभरातील त्यांच्या आंदोलनादरम्यान अनेकवेळा त्यांनी आंतरवाली सराटी येथे भेटी दिलेल्या होत्या. नुकतीच त्यांनी शरद पवार यांची एका शिष्टमंडळासोबत भेट घेतल्यानंतर तेच शिष्टमंडळ घेऊन राजेसाहेब देशमुख हे आंतरवालीत मनोज जरांगे यांच्या भेटीलाही गेले होते.
दोन महिन्यांपूर्वी परळीत धनंजय मुंडेंविरोधात शेतकरी संघर्ष समिती स्थापन करून काढलेल्या मोर्चामध्येही ते सहभागी झाले होते. परळीतून धनंजय मुंडेंविरोधात एक लाख १० हजार संख्येने असलेला मराठा समाज, ४० ते ४५ हजारांच्या संख्येने असलेला धनगर समाज व मुस्लिम-दलित, मतांची एकत्रित मोट बांधण्याचे सूत्र शरद पवारांसमोरील बैठकीत मागील आठवड्यात ठरले असून, त्याला बैठकीत उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला होता.