आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे देशभरातील राजकीय नेते आपल्या सोईच्या पक्षात प्रवेश करत आहेत. सत्ताधारी भाजपानेदेखील देशभरात वेगवेगळ्या नेत्यांना आपल्या पक्षात सामावून घेण्याच्या मोहिमेस सुरुवात केली आहे. गुजरातमध्ये काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या एका नेत्याने आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता काँग्रेसला आणखी एक फटका बसला आहे. सी जे चावडा यांनी नुकतेच आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ते भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
चावडा विजापूरचे आमदार
चावडा हे आतापर्यंत तीन वेळा आमदार राहिलेले आहेत. त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभेच्या अध्यक्षांकडे सोपवला आहे. ते विजापूरचे आमदार होते. ते माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांचे विश्वासू मानले जातात. चावडा यांच्या राजीनाम्यानंतर आता काँग्रेसचे संख्याबळ १५ वर आले आहे.
चावडा फेब्रुवारी महिन्यात भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. ते गुजरात भाजपाचे प्रवक्ते जयराजसिंह जडेजा यांच्या जवळचे मानले जातात. चावडा यांच्या या निर्णयामागे जयराजसिंह असल्याचे म्हटले जात आहे.
काँग्रेसच्या विधानांमुळे देशाची हानी- चावडा
आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर चावडा यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. “सध्या राम मंदिराचे उद्घाटन केले जाणार आहे. काही वर्षांपूर्वी सर्जिकल स्ट्राईक करण्यात आली. अशा प्रसंगांवेळी काँग्रेसने अशी विधाने केली, ज्यामुळे देशाची हानी झाली. मला ते आवडलेले नाही,” असे चावडा म्हणाले.
नरेंद्र मोदी हे जागतिक नेते
“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक नेते म्हणून उदयास आले आहेत. अमित शाह तसेच भाजपाचे इतर नेते मोदी यांना मदत करत आहेत. त्यामुळे अशा मोहिमेमध्ये मला अडथळा व्हायचे नाही. प्रवाहाच्या विरोधात जाण्यापेक्षा प्रवाहासोबत जाणे चांगले,” असे चावडा म्हणाले.
सहकाऱ्यांशी बोलून योग्य निर्णय घेणार- चावडा
आपल्या आगामी निर्णयावर बोलताना चावडा म्हणाले की, मी माझ्या आगामी वाटचालीविषयी माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतरच माझ्या सहकाऱ्यांच्या मतानुसार मी निर्णय घेणार आहे, असे चावडा म्हणाले.
चिराग पटेल यांचाही आमदारकीचा राजीनामा
डिसेंबर महिन्यापासून काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देणारे चावडा हे दुसरे आमदार आहेत. याआधी खंभातचे आमदार चिराग पटेल यांनीदेखील आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांनी भाजपाचे उपाध्यक्ष भारत बोघरा यांच्या उपस्थितीत आमदारीचा राजीनामा दिला होता. पटेलदेखील लवकरच भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. भविष्यातही काँग्रेसचे अनेक आमदार भाजपात प्रवेश करणार आहेत, असे पटेल यांनी सांगितले.
राजीनामा देताना काँग्रेसवर टीका
“काँग्रेसमधील बहुसंख्य आमदार हे नाराज आहेत. गुजरात काँग्रेसमधील गटबाजीने टोक गाठलेले आहे. पक्षातील नवे चेहरे तसेच तरुण नेत्यांना पक्षात प्रोत्साहित केले जात नाही,” असे पटेल यांनी सांगितले. चावडा हे पशुवैद्यकीय शल्यचिकित्सक आहेत. राजकारणात येण्याआधी ते शासकीय सेवेत होते. मात्र राजकारणात सक्रिय होताच त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता. त्यांनी दाखल केलेल्या निवडणुकीच्या शपथपत्रात चावडा हे बांधकाम व्यवसायिक आहेत.
देहगाम येथून विधानसभेची पोटनिवडणूक लढवली
चावडा २००२ साली पहिल्यांदा गांधीनगर मतदारसंघातून आमदार म्हणून निडवून आले. मात्र २००७ साली ते गांधीनगर मतदारसंघातून पराभूत झाले. २००९ साली त्यांनी देहगाम येथून विधानसभेची पोटनिवडणूक लढवली. मात्र ते या निवडणुकीत पराभूत झाले. त्यांनी २०१७ सालची विधानसभा निवडणूक गांधीनगर उत्तर या मतदारसंघातून लढवली. या निवडणुकीत त्यांनी विजयी कामगिरी केली. त्यांची नंतर काँग्रेसचे मुख्य व्हीप म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
अमित शाहांविरोधात लढवली निवडणूक
चावडा यांनी २०१९ साली लोकसभा निवडणूक लढवली. त्यांनी गांधीनगर मतदारसंघातून थेट अमित शाह यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पाच लाख मतांनी पराभव झाला होता. २०२२ सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपला मतदारसंघ बदलला होता. त्यांनी ही निवडणूक विजापूर येथून लढवत विजय मिळवला. २०२२ सालच्या निवडणुकीत काँग्रेसचे एकूण १७ उमेदवार निवडून आले. या १७ जणांमध्ये चावडा यांचा समावेश होता. चावडा यांच्या पत्नी फाल्गुनी या गुजरात सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या संचालक आहेत. त्यांचा मुलगा भरतसिंह गुजरातमध्ये सेक्शन ऑफिसर आहे