नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत मित्रपक्षाशी चर्चा करताना पक्षाची योग्य पद्धतीने बाजू लावून न धरल्याबद्दल महाराष्ट्रातील नेत्यांवर नाराजी व्यक्त केली. तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या जागा निश्चित करताना पक्षातील नेते दुराग्रह बाळगत असल्याबद्दल खासदार प्रतिभा धानोरकर यांनी संताप व्यक्त केला. वेळ आल्यास पक्ष सोडण्याचा इशाराही त्यांनी दिल्याची माहिती आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत दिल्ली आणि मुंबईत बैठका सुरू आहेत. विशेषत: विदर्भातील जागांवरून शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात बिनसले . काँग्रेसला अपेक्षापेक्षा कमी जागा मिळाल्याने आणि जागा वाटपाची चर्चा लांबल्याने राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. दरम्यान शनिवारी काँग्रेसने उमेदवाराची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये २३ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. परंतु प्रतिभा धानोरकर यांनी खासदार होण्यापूर्वी ज्या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले त्या वरोरा मतदारसंघाच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले नाही. त्यामुळे त्या संतापलेल्या आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा मतदारसंघ प्रतिभा धानोरकर यांना त्यांचे बंधू प्रवीण टाकळे यांच्यासाठी हवा आहे. काँग्रेसचा विद्यमान आमदार येथे असताना शिवसेनेने या जागेवर दावा केला आहे. या जागेसाठी प्रतिभा धानोरकर यांचे दीर अनिल धानोरकर यांनी आधी काँग्रेसकडून प्रयत्न केले. परंतु धानोरकर आपल्या भावासाठी आग्रही असल्याचे लक्षात येताच अनिल धानोरकर हे शिवसेनेच्या (ठाकरे) संपर्कात आले आहेत. त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मागितली आहे. खासदार धानोरकर यांनी पक्षाकडे वरोरा मतदारसंघाबाबत आपल्याला निर्णय घेऊ देण्याची मागणी केली. परंतु या जागेबाबत अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे त्या नाराज असून पक्षाचा राजीनामा देण्याचा इशारा दिल्याची माहिती आहे.

हे ही वाचा… काँग्रेसमध्ये देशमुख यांना एक न्याय व निलंगेकरांना दुसरा याबद्दल असंतोष

काय म्हणाल्या खा.धानोरकर

दरम्यान, याबाबत प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, खासदार म्हणून आपल्या मतदारसंघातील जागांवर उमेदवार निश्चित करण्याचा अधिकार आहे. निवडूण येण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात यावी, अशी माझी मागणी आहे. मेरिटनुसार उमेदवारी मिळावी असा आग्रह धरणे हे पक्षाच्याच हिताचे आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच त्यांनी पक्षाचा राजीनामा देण्याचे वृत्त फेटाळले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress mp pratibha dhanorkar threatens to resign over seat allocation issue print politics news asj