काँग्रेस पक्षाला तब्बल २४ वर्षांनंतर मल्लिकार्जून खरगेंच्या रुपाने गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती अध्यक्ष म्हणून लाभली आहे. त्याआधी जवळपास दोन दशकांपर्यंत या पक्षाचं नेतृत्व सोनिया गांधी यांनी समर्थपणे सांभाळलं. त्यांच्या या खंबीर नेतृत्वाचा गौरव करत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आईसाठी ट्विटरवर एक भावनिक पोस्ट केली आहे. दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आठवणींना उजाळा देत राहुल यांनी सोनिया गांधींना भावनिक साद घातली आहे. “आई, आजीने मला सांगितलं होतं की तिला नसलेली मुलगी तू आहेस. त्या किती बरोबर होत्या. मला तुझा मुलगा असल्याचा अभिमान आहे” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Congress Steering Committee: शशी थरुर यांना सुकाणू समितीत स्थान नाही; पृथ्वीराज चव्हाण, भुपिंदर सिंह हुड्डांनाही वगळलं

राहुल गांधींनी ट्विटरवर दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासोबतचा सोनिया गांधी यांचा फोटो पोस्ट केला आहे. १९९१ मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान राजीव गांधींची ‘एलटीटीई’च्या दहशतवाद्यांनी हत्या केली होती. दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधीनीही इन्स्टाग्रामवर आईसाठी पोस्ट लिहिली आहे. “आई, मला तुझा अभिमान आहे. जगाने काहीही म्हटलं किंवा विचार केला तरी मला माहित आहे की तू हे प्रेमासाठी केलं”, असे प्रियांका गांधींनी म्हटले आहे.

गांधी कुटुंबाचे निष्ठावंत आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी बुधवारी सोनिया गांधींकडून काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. या कार्यक्रमात बोलताना सोनिया गांधी यांनी भावनांना वाट मोकळी करुन दिली. “मी माझ्या क्षमतेनुसार माझे कर्तव्य पार पाडले आहे. मी आता या जबाबदारीतून मुक्त झाले आहे. माझ्या खांद्यावरुन हा भार आता कमी झाला आहे”, असे सोनिया गांधींनी म्हटले आहे.

‘भारत जोडो यात्रे’चा कर्नाटकात सकारात्मक परिणाम, दिग्गज नेत्यांचं मनोमिलन; काँग्रेस कात टाकणार?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांचा पराभव करत मल्लिकार्जून खरगे काँग्रेसचे नवे अध्यक्ष बनले आहेत. या निवडणुकीत खरगे यांना ७,८९७ मतं मिळाली आहेत. या निवडणुकीच्या निष्पक्षतेबाबत विरोधकांकडून आरोप करण्यात आले आहेत. हे आरोप फेटाळून लावत ही निवडणूक मोठं यश असून लोकशाही मुल्यांचा हा पुरावा आहे, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress mp rahul gandhi emotional twitter post for sonia gandhi remembering indira gandhi and rajiv gandhi rvs
Show comments