काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो यात्रा’ सध्या मध्य प्रदेशात पोहोचली आहे. कन्याकुमारीपासून सुरू झालेली ही यात्रा काश्मीरपर्यंत जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी (२६ नोव्हेंबर) राहुल गांधींनी संविधान दिवसाचं औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मस्थान असणाऱ्या मध्यप्रदेशातील महू येथे भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह विविध नेते उपस्थित होते. महू येथे जाहीर सभेला संबंधित करताना राहुल गांधींनी भाजपा आणि ‘आरएसएस’वर निशाणा साधला.
“भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ छुप्या पद्धतीने संविधानाची पायमल्ली करत आहेत. संविधान मोडीत काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भाजपा आणि आरएसएसचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसमोर हात जोडतात आणि पाठीत वार करतात. महात्मा गांधींबाबतही त्यांची अशीच भूमिका आहे. त्यांनी देशातील सर्व प्रमुख संस्थांवर ताबा मिळवला आहे. अगदी न्यायव्यवस्थेपासून भारतीय लष्कर आणि प्रसारमाध्यमांमध्ये त्यांनी घुसखोरी केली आहे” असा आरोपकाँग्रेस खासदार राहुल गांधींनी केली.
हेही वाचा- ‘भारत जोडो’चे पडद्यामागील किस्से आणि व्यवस्थापन यंत्रणेचे अनुभव
“संविधान हे केवळ एक पुस्तक नाही. संविधानातून तिरंग्याला ताकद मिळते. आरएसएसने भारत देश स्वातंत्र झाल्यानंतर सुमारे ५२ वर्षे आपल्या मुख्यालयात राष्ट्रध्वज फडकवला नव्हता” असंही राहुल गांधी म्हणाले.
आपल्या भाषणात राहुल गांधी पुढे म्हणाले,“भाजपा किंवा आरएसएस कधीच आंबेडकरांचा उघडपणे अपमान करू शकत नाहीत. महात्मा गांधींबाबतही त्यांची हीच भूमिका आहे. घाबरू नका आणि हिंसाचार करू नका, असा संदेश गांधींनी दिला होता. आरएसएसचे लोक यापूर्वी कधीही गांधींपुढे हात जोडत नव्हते. ते नथुराम गोडसेपुढे हात जोडायचे. पण आता त्यांना गांधींपुढे नतमस्तक होण्यास भाग पाडलं जातं. ते गांधी पुतळ्यासमोर हात जोडतात आणि नंतर गांधींनी दिलेला अहिंसेचा संदेश पुसून टाकतात.”