यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलेच वादळी ठरत आहे. अदाणी प्रकरणामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून त्याचे प्रतिबिंब कामकाजादरम्यान उमटत आहे. ९ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देत असताना विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संसदेतील या गोंधळाचे रजनी पाटील यांनी चित्रिकरण केल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच त्यांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> “मी दिलगिरी व्यक्त..” जुना अर्थसंकल्प वाचल्याबद्दल राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मागितली माफी
रजनी पाटील यांनी व्हिडीओ सोशल मीडियावर सार्वजनिक केल्याचा आरोप
रजनी केशवराव पाटील यांना उर्वरित अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. संसदेतील गैरव्यवहारामुळे राज्यसभेचे अध्यक्ष तथा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी हा निर्णय घेतला आहे. संसदेतील कामकाजाचा व्हिडीओ रजनी पाटील यांनी चित्रित केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. विशेषाधिकार समितीकडून व्हायरल झालेला व्हिडीओची चौकशी केली जाणार आहे.
संसदेत नेमके काय झाले होते?
९ फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदी भाषण करत होते. तर दुसरीकडे विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात होते. याच गोंधळाचे चित्रिकरण करण्यात आले. तसेच हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ रजनी पाटील यांनी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच कारणामुळे धनखड यांनी हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा >>> “…तर नरेंद्र मोदींनी चौकशीचे आदेश द्यावेत,” गौतम अदाणी प्रकरणावर महुआ मोईत्रांचे टीकास्र
विशेष समितीकडून चौकशी केली जाईल
“ट्विटर या समाजमाध्यमावर राज्यसभेतील कामकाजाबद्दलचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. रजनी पाटील यांचा यामागे संबंध असल्याचे वाटत आहे. त्यामुळे या प्रकरणाची दखल घेणे गरजेचे आहे. या सर्व प्रकाराची विशेष समितीकडून चौकशी केली जाईल,” असे धनखड यांनी सांगितले. तसेच संसदेचे पावित्र्य राखण्यासाठी या प्रकरणाची कोणत्याही बाहेरच्या संस्थेकडून चौकशी करण्यात येणार नाही, असेही धनखड म्हणाले.