Who is MP Rakesh Rathore : उत्तर प्रदेशच्या सीतापूरचे काँग्रेस खासदार राकेश राठोड यांना पोलिसांनी गुरुवारी (३० जानेवारी) अटक केली आहे. एका महिलेने राठोड यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांच्यावर १७ जानेवारीला गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच राठोड यांनी जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने त्यांचा जामीनअर्ज फेटाळून लावला आणि दोन आठवड्यांच्या आत आत्मसमर्पण करण्यास सांगितले. गुरुवारी पत्रकार परिषद घेत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
कोण आहेत राकेश राठोड?
तेली समुदायातील असलेले ६१ वर्षीय राकेश राठोड हे इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात बहुजन समाज पक्ष (बसपा) मधून केली होती. २००७ च्या विधानसभा निवडणुकीत राठोड यांनी सीतापूर येथून विधानसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी समाजवादी पार्टीचे उमेदवार राधेश्याम जयस्वाल यांनी त्यांचा एक हजार ८६७ मताधिक्याने पराभव केला. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राठोड यांनी भाजपात प्रवेश केला आणि सीतापूर मतदारसंघातून विजय मिळवला.
आणखी वाचा : दिल्लीचा राजकीय इतिहास – भाजपाला दिल्लीचे तख्त राखण्यात अपयश का?
भाजपा सरकारवर केली होती टीका
अत्यंत कमी कालावधीत राठोड यांनी भाजपाचे सक्रिय नेते म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. परंतु, दोन वर्षांनंतर त्यांचे पक्षातील इतर नेत्यांबरोबरचे संबंध बिघडू लागले. सीतापूरमधील एका भाजपा नेत्याने सांगितले, “राकेश राठोड यांनी भाजपाचे संघटन आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली होती, त्यामुळे पक्षाने त्यांना संघटनात्मक बैठकींना आमंत्रित करणं बंद केलं. मे २०२१ मध्ये करोना काळात राठोड यांनी भाजपा सरकारला लक्ष्य केलं होतं. त्यानंतर २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना तिकीट नाकारलं होतं.”
२०२२ मध्ये समाजवादी पार्टीत प्रवेश
भाजपाचे आमदार असताना राकेश राठोड यांनी करोना काळात उत्तर प्रदेश सरकारला तिखट प्रश्न विचारले होते. “मी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे कदाचित माझ्यावर देशद्रोहाचा आरोप लावला जाईल”, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून आपल्याला तिकीट मिळणार नाही हे राठोड यांच्या लक्षात आलं होतं, त्यामुळेच त्यांनी ओबीसी नेत्यांसह समाजवादी पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. पक्षाला सोडचिठ्ठी देताना राठोड यांनी विखारी टीका केली होती. भाजपा उच्चवर्णीय मानसिकतेने काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीकडून आपल्याला उमेदवारी मिळेल अशी राठोड यांना आशा होती, मात्र ऐनवेळी पक्षाने त्यांना तिकीट देण्यास नकार दिला. त्याचवेळी भाजपाने सीतापूर मतदारसंघात नवीन रणनीती आखली आणि राकेश राठोड यांच्या नावात साम्य असलेल्या दुसऱ्या उमेदवाराला उमेदवारी दिली. या उमेदवाराचं नाव राकेश राठोड ऊर्फ गुरू असं होतं.
सीतापूरमधून भाजपाच्या उमेदवाराचा विजय
तेली समुदायातून आलेल्या गुरू यांनी सपाच्या उमेदवाराचा पराभव करून विधानसभेची निवडणूक जिंकली. सीतापूर मतदारसंघ काबीज केल्यानंतर भाजपाने गुरू यांना मंत्रिमंडळात सामील करून घेतलं. त्यांच्याकडे शहरी विकास, शहरी रोजगार आणि गरिबी निर्मूलन खात्याचा पदभार देण्यात आला. भाजपाच्या एका नेत्याने सांगितले, “पक्षाला राज्यात ओबीसींचं नेतृत्व तयार करायचं होतं, त्यामुळे तेली समुदायातून आलेल्या गुरू यांना निवडणुकीचं तिकीट देण्याचा निर्णय घेतला होता.”
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राठोड यांचा विजय
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत पक्षाने तिकीट नाकारल्यानंतरही राकेश राठोड यांनी समाजवादी पार्टीतच राहण्याचा निर्णय घेतला. २०२३ च्या सीतापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली. मात्र, पुन्हा एकदा ‘सपा’ने तिकीट नाकारल्यानंतर राठोड यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि जून २०२३ मध्ये काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने युती केली होती. त्यावेळी सीतापूर लोकसभा मतदारसंघातून राकेश राठोड यांना उमेदवारी देण्यात आली. तेव्हा सपाच्या स्थानिक नेत्यांनी त्यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध केला. मात्र, सपाच्या विरोधाला न जुमानता राठोड यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि भाजपाचे उमेदवार राजेश वर्मा यांचा तब्बल ८९ हजार मताधिक्याने पराभव केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २००७ मध्ये वर्मा यांनीच राठोड यांना बसपा आणि २०१७ मध्ये भाजपाकडून विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळवून देण्यास मदत केली होती.
हेही वाचा : अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पाठिशी का घालत आहेत ?
भाजपातील जुन्या सहकाऱ्यालाच केलं पराभूत
२००७ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी राजेश वर्मा बहुजन समाजवादी पार्टीचे सीतापूरचे खासदार होते. २०१७ मध्ये त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आणि पुन्हा लोकसभेची निवडणूक जिंकली होती. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राठोड यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी पक्षाचे नेते संजय दीक्षित यांच्यावर जातीयवादाचा आरोप केला. उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या ‘वॉर रूम’मध्ये दीक्षित यांनी मला अपमानित केले, असं राठोड म्हणाले होते. या आरोपानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.
काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले, “राकेश राठोड हे तेली समुदायातील नेते आहेत, ज्यांची संख्या संपूर्ण मतदारसंघात अत्यंत कमी आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत संविधानाच्या मुद्द्यावरून पासी समुदायाने सपा आणि काँग्रेसला पाठिंबा दिला. पासी समुदायाची लोकसंख्या सीतापूर मतदारसंघात सुमारे सात लाख इतकी आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळेच राठोड खासदार झाले.”
राठोड यांच्यावर बलात्काराचे आरोप करणारी महिला कोण?
२०१७ मध्ये सीतापूरचे आमदार झाल्यानंतर राकेश राठोड यांनी तेली महासंघाची स्थापना केली होती. तेली समाजात सामाजिक आणि राजकीय जागरूकता निर्माण व्हावी हा यामागचा उद्देश होता. सध्या ही संघटना उत्तर प्रदेशातील सुमारे ३० जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे. एका सूत्राने सांगितले की, “राठोड यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या महिलेने तेली महासंघात पदाधिकारी म्हणून काम केलं आहे. लग्नाचे खोटे आश्वासन देऊन राठोड यांनी आपल्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. यासंदर्भात १७ जानेवारी रोजी पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. बुधवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाने राठोड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.”