LOP Rahul Gandhi: काँग्रेस पक्षाचे खासदारांनी बुधवारी (दि. २६ मार्च) लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू दिले जात नसल्याचा मुद्दा मांडला. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी बोलत असतानाच अध्यक्षांनी सभागृहाची बैठक तहकूब केली, हा मुद्दा खासदारांच्या शिष्टमंडळाने उपस्थित केला. काँग्रेसचे सभागृह उपनेते गौरव गोगोई, राष्ट्रीय महासचिव केसी वेणूगोपाल, प्रतोद मणिकम टागोर आणि इतर ७० खासदारांनी अध्यक्षांची भेट घेतली. विरोधी पक्षनेते आणि विरोधकांनी सभागृहाची प्रतिष्ठा जपली पाहिजे, असे विधान ओम बिर्ला यांनी केले होते. यानंतर शिष्टमंडळाने ही भेट घेतली.

तत्पूर्वी अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, सदस्यांनी सभागृहाची मर्यादा आणि प्रतिष्ठा जपली पाहिजे. सभागृहातील अनेक सदस्यांचे वर्तन नियम आणि प्रतिष्ठेला धरून नसल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. प्रत्येकाने नियम आणि परंपरा जपलीच पाहिजे. विशेषतः विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वतः नियमांचे पालन करून आदर्श घालून दिला पाहिजे. यानंतर राहुल गांधी बोलायला उभे राहताच अध्यक्षांनी सभागृह तहकूब केले.

तत्पूर्वी ओम बिर्ला यांनी नियम ३४९ नुसार सदस्यांनी वागायला हवे, असेही सांगितले. लोकसभेच्या नियम ३४९ नुसार सदस्यांनी सभागृहात कसे वागावे, याचे नियम घालून दिलेले आहेत.

सभागृह तहकूब झाल्यानंतर राहुल गांधी यांनी संसदेच्या आवारात पत्रकारांशी संवाद साधला. सभागृह लोकशाही नियमांनुसार चालत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

माध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, लोकसभा अध्यक्षांनी शिस्तपालनाचे आवाहन केल्यानंतर मला बोलूच दिले नाही. ते उठले आणि निघून गेले. विरोधी पक्षनेत्याला न बोलू देताच अध्यक्ष उठतात आणि निघून जातात. त्यांनी माझ्याबद्दल निराधार विधान केले आणि सभागृह तहकूब करण्याची गरज नसतानाही त्यांनी सभागृह तहकूब केले.

राहुल गांधी पुढे म्हणाले, “सभागृहात जेव्हा विरोधी पक्षनेता उभा राहतो, तेव्हा त्याला बोलू दिले पाहिजे, असे संकेत आहेत. मी जेव्हा सभागृहात उभा राहतो. मला बोलू दिले जात नाही. कोणत्या प्रकारे सभागृह सुरू आहे, हे मला कळत नाही. आम्ही जे बोलू इच्छितो, ते बोलू दिले जात नाही. मागच्या सात-आठ दिवसांपासून मला बोलूच दिलेले नाही. अशाप्रकारे सभागृह चालू शकत नाही. लोकशाहीमध्ये सरकार आणि विरोधक या दोघांचीही स्वतःची एक जागा असते. पण इथे विरोधकांचे काहीच स्थान नाही. इथे फक्त सरकारच दिसते.”

“पंतप्रधान मोदींनी त्यादिवशी महाकुंभबाबत भाष्य केले. मीही त्यावेळी माझे मनोगत मांडणार होतो. महाकुंभचे कौतुक करत मी बेरोजगारीवर बोलणार होतो. पण मला बोलू दिले नाही. अध्यक्षांना नेमके काय वाटते, हे कळत नाही. आमचा पक्ष प्रमुख विरोधी पक्ष आहे. तरीही लोकशाहीविरोधी पद्धतीने सभागृह चालवले जात आहे”, असा माझा आरोप आहे.

काँग्रेसचे खासदार वेणूगोपाल यांनी सार्वजनिक हिताच्या मुद्द्यावर आपले भाषण संपविल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदस्यांच्या वर्तनाबाबत चिंता व्यक्त करणारे विधान केले आणि त्यानंतर त्यांनी लागलीच सभागृहाची बैठक तहकूब केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकुंभमेळ्याबाबत सभागृहात निवेदन केल्याच्या एक आठवड्यानंतर आज अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आपली नाराजी व्यक्त केली. प्रयागराजमधील महाकुंभच्या आयोजनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. ते बोलत असताना विरोधी सदस्यांनी गोंधळ घातला होता. प्रयागराज येथे झालेल्या चेंगराचेंगरीबाबत विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले होते.