दिगंबर शिंदे

सांगली : राज्यात सत्तांतरानंतर सांगली महापालिकेतील राष्ट्रवादी, काँग्रेसमधील काही नाराज नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षात प्रवेश करण्याच्या मन:स्थितीत आहेत. यासाठी सत्तारूढ गटाचा मित्रपक्ष असलेल्या एका पक्षाचे प्रदेश पदाधिकारी प्रयत्नशील असून प्राथमिक बोलणीही झाली आहेत. जिल्ह्यात अगोदरच बहुतांश नेत्यांनी भाजपचा रस्ता पकडलेला असताना आता उर्वरित नेत्यांनीही भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिंदे गटाची वाट पकडल्याने जिल्ह्यातील दोन्ही काँग्रेसच्या पुढील अडचणीत वाढ झाली आहे.

सांगली, मिरज, कूपवाड महापालिकेत भाजपचे बहुमत आहे. तर विरोधी गटाकडे काँग्रेसचे २० तर राष्ट्रवादी काँग्रेसचे १५ नगरसेवक आहेत. आता महापालिका निवडणुका केवळ आठ महिन्यांवर आल्या आहेत. या निवडणुकीवर राज्यात नुकतेच झालेल्या सत्तांतराचे परिणाम आताच दिसू लागले आहेत. सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ यांच्या प्रभावामुळे या दोन पक्षांकडे कार्यकर्त्यांचा अधिक ओढा आहे. यामुळे गेल्या चार वर्षांपासून दोन्ही काँग्रेसमधील नाराज तसेच आगामी राजकारणाची दिशा पाहून अनेक नगरसेवकांनी आपली पावले आता सत्तेतील भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेकडे वळवली आहेत.

हेही वाचा… अमित ठाकरे यांच्यासमोर शिकवणी वर्गाच्या भरमसाठ शुल्काचा प्रश्न चर्चेत ; मराठवाड्यातील विद्यार्थ्यांशी मनसे संवाद

महाविकास आघाडीची सत्ता असताना त्यांच्या दबावातून मध्यंतरी महापौर निवडीवेळी भाजपमधील सहा व एक अपक्ष यांनी आघाडीच्या उमेदवाराना मतदान केल्याने भाजपचे बहुमत असतानाही सत्तेवरून पायउतार व्हावे लागले होते. या घटनेलाही आता दीड वर्षे होऊन गेली. दरम्यान, महापालिकेत आघाडीची सत्ता असूनही तिजोरीच्या चाव्या मात्र भाजपकडे असे त्रांगडे झाल्याने अनेक नगरसेवकांची कामेच होत नसल्याचा सार्वत्रिक सूर आळवला जात आहे. दुसरीकडे भाजपला बहुमत असतानाही सत्तेच्या प्रभावातून महाविकास आघाडीने सत्तातंर घडवल्याने या प्रयोगातूनही दोन्ही काँग्रेसबद्दल नाराजी निर्माण झालेली आहे.

हेही वाचा… ८९ वर्षांच्या देवेगौडा यांचे राजकारणात कमबॅक…

सत्ता असून कामे होत नाहीत, जनतेतील नाराजी आणि आता राज्यात घडलेले सत्तांतर याचा परिणामस्वरूप आता दोन्ही काँग्रेसमधील अनेक नगरसेवकांनी आपली पावले आता सत्तेतील भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेकडे वळवली आहेत. राष्ट्रवादीत तर सध्या मोठ्या प्रमाणात गटबाजी उफाळून आलेली आहे. यातूनच स्थायी सभापती निवडीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्य अनुपस्थित राहिल्याचे बोलले जात आहे. सध्या पक्षातच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. राष्ट्रवादीमधील गटबाजी शिरजोर होत असल्याचे लक्षात येताच प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी सर्व सदस्यांची बैठक घेऊन समजूत काढण्याचे प्रयत्न केले. या वेळी अनेक सदस्यांनी पक्ष म्हणून पदाधिकारी विश्वासात घेत नसल्याचा आरोप केला. या आरोपावरही तातडीने कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे लक्षात आल्यावर या अस्वस्थ सदस्यांनी आगामी निवडणुकीवेळी वेगळा मार्ग स्वीकारण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपच्या तंबूत गेले तर मतदारांना हा निर्णय पटवून सांगणे महाकठीण वाटत असल्याने त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षात सामील होण्यास सहमती दर्शवली आहे. मात्र, याला भाजपचाही पाठिंबा राहणार आहे. किंबहुना हक्काचा मतदार दुरावू नये यासाठी भाजपच्या नेत्यांनीच मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून तसा प्रस्ताव दिला आहे.

हेही वाचा… पक्षाला संजय राऊतांसारखा उत्तम प्रवक्ता हवा आहे… आहे का कुणी?

मुख्यमंत्री शिंदे यांचा सांगली जिल्ह्यात जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या माध्यमातून गट बांधणीचे प्रयत्न सुरू आहेत. विटा-खानापूरचे आमदार अनिल बाबर हे जरी या पक्षाचे असले तरी महापालिका क्षेत्रात पवार, बाबर यांना गट विस्तारामध्ये अडचणी असल्याने मित्र पक्षाच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रामध्ये गटबांधणी करण्याचे नियोजन सुरू आहे. यामुळे नजीकच्या काळात याचा फटका राष्ट्रवादी बरोबरच काँग्रेसलाही बसण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेसमधील नाराज सदस्य पुन्हा एकदा सत्तेच्या वळचणीला जाण्यासाठी मुहूर्ताची प्रतीक्षा करीत आहेत. जिल्ह्यात अगोदरच बहुतांश नेत्यांनी भाजपचा रस्ता पकडलेला असताना आता उर्वरित नेत्यांनीही भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिंदे गटाची वाट पकडल्याने जिल्ह्यातील दोन्ही काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत.

Story img Loader