अमरावती : भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांचे पाठबळ, सत्तेचे वलय अशा अनुकूल बाबी सोबत असूनही भाजपच्या नवनीत राणा यांना अमरावतीची जागा गमवावी लागली. त्यांना पराभवाची धूळ चारणारे काँग्रेसचे बळवंत वानखडे यांची सरपंच ते खासदारकी पर्यंतची झेप लक्षवेधी ठरली आहे.
रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते रा. सू. गवई, दे. झा. वाकपांजर यांच्या आंबेडकरी चळवळीच्या मुशीतून तयार झालेले बळवंत वानखडे यांना काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमत: आमदार म्हणून विजयाची संधी मिळाली आणि आमदारकीचा कार्यकाळ संपण्याआधीच ते लोकसभेत पोहचले.
हेही वाचा…चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ : दारूबंदीचा निर्णय भाजपला भोवला
सर्वसामान्यांसोबत जुळलेला शांत, संयमी कार्यकर्ता ही बळवंत वानखडे यांनी खरी ओळख. दर्यापूर तालुक्यातील थिलोरीच्या झामाजी वाकपांजर कनिष्ठ महाविद्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून ते कार्यरत असतानाच रिपाइंचे नेते रा.सू. गवई यांच्या राजकीय वर्तुळात वावरण्यास त्यांनी सुरूवात केली. कालांतराने त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. दरम्यान, राजकीय कार्यकर्ता म्हणून अल्पकाळात आपले अस्तित्व निर्माण केले. दर्यापूर तालुक्यातील लेहगाव हे त्यांचे गाव. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, त्यानंतर थेट जिल्हा परिषद सदस्य, सभापती, दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वाचनाची, भटकंतीची त्यांना आवड आहे. सर्व समाजातील नेत्यांसोबत चांगले संबंध, कार्यकर्त्यांशी थेट संपर्क त्यांच्या विजयात दुवा ठरला.
हेही वाचा…कोल्हापुरात ‘गादी’ला घेरण्याची रणनीती विरोधकांवरच उलटली
२००९ मध्ये दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली, त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दर्यापूरमधून ते रिपाइं गवई गटातर्फे निवडणूक रिंगणात होते. यावेळीही त्यांना पराभव पत्करावा लागला. पण, २०१९ मध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली आणि दर्यापूरमधून ३० हजारांहून अधिक मताधिक्याने ते निवडून आले. जिल्ह्यात सर्वाधिक मते मिळवून निवडून आलेला आमदार म्हणून त्यांची नोंद झाली. प्रश्नांच्या मुळाशी जाऊन उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणे हे बळवंत वानखडे यांचे वैशिष्ट्य. सर्वसामान्यांशी नाळ जुळवून ठेवत सरपंच ते खासदार हा त्यांच्या यशाचा चढता आलेख आहे.