अलिबाग: महाविकास आघाडीच्या जागावाटपात कोकणात काँग्रेसची पाटी कोरी राहिली आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षाला एकही जागा मिळालेली नाही. त्यामुळे काँग्रेसला या निवडणुकीत फक्त प्रचाराची भूमिका पार पाडावी लागणार आहे. काँग्रेसकडून कोकणातील अनेक नेत्यांनी देशपातळीवर नावलौकिक मिळवला. यात नानासाहेब कुंटे, बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचा समावेश आहे. याशिवाय गोविंदराव निकम, निशिकांत जोशी, चंद्रकात देशमुख, शं भा. सांवत, बॅरिस्टर ए. टी. पाटील, हुसेन दलवाई, भास्कर सुळे यांनी राज्यात पक्षाच्या जडणघडणीत योगदान दिले. पण आता परिस्थिती बदलली आहे. पक्षाकडे जनाधार असलेले नेतृत्त्व नाही.
u
रायगड जिल्ह्यातील सातपैकी तीन जागांवर उमेदवारी मिळावी यासाठी जिल्हा काँग्रेस समितीने मागणी केली होती. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची परिस्थिती फारशी वेगळी नाही. रत्नागिरीतील पाच विधानसभा मतदारसंघांपैकी एकही जागा काँग्रेसच्या वाट्याला आलेली नाही. राजापूर मतदारसंघातून काँग्रेसचे अविनाश लाड इच्छुक होते. मात्र येथे ठाकरे गटाचे विद्यामान आमदार आहेत. त्यामुळे नाराज झालेल्या लाड यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसचा प्रभाव कमी झाला. पक्षाला पुढे नेऊ शकेल असे नेतृत्व पक्षाकडे राहिलेले नाही. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तीन जिल्ह्यांत एकूण १५ मतदारसंघ आहेत. रायगडमधील सात, रत्नागिरीतील पाच तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन मतदारसंघांचा समावेश आहे.
“लोकसभा निवडणुकीत पक्षाकडे आम्ही उमेदवारी मागितली पण दिली नाही. आता विधानसभा निवडणुकीतही आम्हाला एकही मतदारसंघ मिळाला नाही. त्यामुळे आज संवाद मेळावा घेऊन आम्ही जिल्ह्यातील माझ्यासह सर्व दोनशे ते अडीचशे पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय घेतला आहे”. – महेंद्र घरत, जिल्हाध्यक्ष, रायगड.
वीस वर्षांत घसरण
रायगड जिल्ह्यात २००४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे चार आमदार निवडून आले होते. शेकाप आणि काँग्रेस हेच जिल्ह्यातील प्रमुख पक्ष म्हणून ओळखले जायचे. मात्र २००९ च्या निवडणुकीनंतर पक्षाला उतरती कळा लागली. रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर, रवींद्र पाटील यांच्यासारखे जेष्ठ नेते पक्षाला सोडून भाजपमध्ये गेले. अलिबाग मधुकर ठाकूर आणि महाडमध्ये माणिकराव जगताप यांच्या पश्चात काँग्रेसची वाताहत झाली. माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या पश्चात पक्षाला एकसंध ठेवू शकेल असे नेतृत्व नाही.